पुणे : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मुक्कामासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा नागपुरे यांनी मंगळवारी (७ जुलै) विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पालखी विठोबा चौक, निवडुंगा विठोबा देवस्थान, ज्योतिबा फुले गर्ल्स हायस्कूल (नाना पेठ) तसेच शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या जर्मन मांडवांची आणि वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची तपासणी करण्यात आली. पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा, शौचालये, निवास व्यवस्था तसेच इतर मूलभूत सोयींचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

पालखी मुक्कामादरम्यान वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मंजुषा नागपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.या पाहणी दौऱ्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पालिका उपायुक्त माधव जगताप, नगरसेविका पल्लवी जावळे, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेवक राजेंद्र काकडे, नगरसेविका स्नेहा माळवदे, मंदिर समितीचे विश्वस्त, नागरिक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
