सोलापूर : 'सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर केलेल्या तक्रारीची अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गंभीर दखल घेत मोठी कारवाई केली आहे. तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्यानंतर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकल दुकानातील औषध विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईनंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.
अरबाज शेखने आपल्या वडिलांच्या उपचारादरम्यान आलेला अनुभव सोशल मीडियावर मांडला होता. वडिलांना मेंदूविकार आणि त्यानंतर हृदयाशी संबंधित त्रास झाल्याने त्यांना नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे आणि इंजेक्शन्स खरेदी करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओद्वारे केला होता. तसेच, सुरुवातीला ठेव रक्कम भरल्यानंतर सुमारे ४० हजार रुपयांहून अधिक किमतीची औषधांची यादी देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता.
या व्हिडिओची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित मेडिकलची तपासणी केली. तपासादरम्यान औषध विक्री आणि कामकाजातील काही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याने मेडिकल दुकानाविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यानुसार पुढील आदेश मिळेपर्यंत दुकानातील औषध विक्री बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कारवाईनंतर अरबाज शेखने व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे प्रतिक्रिया देत हा विषय आता आपल्यासाठी संपला असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या आपल्या वडिलांची प्रकृती आणि कुटुंबाची काळजी घेणे हेच सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगत, या कठीण काळात साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर फोन आणि संदेश येत असल्यामुळे तो व्हिडिओ हटवल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नोबल हॉस्पिटल प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर कोणत्याही विशिष्ट मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती करण्यात आलेली नसल्याचा दावा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजद अली खान यांनी केला. रुग्णाच्या आजारानुसार उपचाराचा संभाव्य खर्च आणि आवश्यक औषधांची माहिती नातेवाईकांना आधीच देण्यात आली होती. त्यामुळे हॉस्पिटलकडून कोणताही नियमभंग झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अरबाज शेखच्या तक्रारीनंतर झालेल्या या कारवाईमुळे खासगी रुग्णालयांमधील औषध खरेदीच्या पद्धती, रुग्णांचे अधिकार आणि नियमांचे पालन या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अंतिम अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.