पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी विठ्ठलनामाच्या गजरात मार्गक्रमण करत असताना माणुसकीचा हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. वारकऱ्यांच्या आगमनामुळे नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेची व्यापक तयारी केली आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी एका वारकऱ्याचे प्राण वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पालखी सोहळ्यादरम्यान संबंधित वारकरी फिट येऊन खाली पडला होता. प्रसंगावधान राखत डॉ. भाजीभाकरे यांनी तातडीने मदत करत त्याला वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था केली.
पालखी मार्गावर चालत असलेल्या एका वारकऱ्याला अचानक फिट आल्याने तो रस्त्यावर कोसळला. काही क्षणांसाठी परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र घटनास्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी विलंब न करता त्या वारकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेतली.
डॉ. भाजीभाकरे यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून संबंधित वारकऱ्याला तातडीने प्रथमोपचार दिले. त्याचबरोबर इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. वारकऱ्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तात्काळ निर्णयामुळे आणि योग्य उपचारांमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवक दिवसरात्र कार्यरत आहेत. अशा गर्दीच्या वातावरणात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या घटनेतही पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे एका वारकऱ्याचा जीव वाचला.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या सेवाभाव, प्रसंगावधान आणि माणुसकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पालखी सोहळ्यात केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचीच नव्हे, तर गरज पडल्यास जीव वाचवण्यासाठीही पोलीस तत्पर असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.या घटनेनंतर सोशल मीडियावर डॉ. भाजीभाकरे यांचे कौतुक होत असून, कर्तव्याबरोबरच माणुसकीचे दर्शन घडवल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.