सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
 शहर

मोशी दुर्घटनेत ९ जणांसाठी देवदूत ठरले अग्निशमन दलाचे जवान; १४ तासांच्या थरारक बचाव मोहिमेला सलाम

डिजिटल पुणे    09-07-2026 18:33:10

पिंपरी चिंचवड : मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प परिसरात झालेल्या इमारत दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांनी अतुलनीय धाडस दाखवत नऊ जणांचे प्राण वाचवले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जवानांनी सलग १४ तास जीवाची पर्वा न करता बचावकार्य राबवले. या मोहिमेत अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ, पुंडलिक भुतापल्ले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत धाडसी कामगिरी बजावली.

विषारी वातावरणातही सुरू ठेवले बचावकार्य

दुर्घटनेनंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकासमोर अनेक अडचणी होत्या. कोसळलेल्या स्लॅबखाली मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. आत ऑक्सिजनचा अभाव, विषारी वायू आणि उष्णतेमुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जवानांनी मागे न हटता बचावकार्य सुरू ठेवले.

दोन टप्प्यांत सलग १४ तासांची मोहीम

जवानांनी बुधवारी दुपारी सुरू केलेले रेस्क्यू ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा बचावकार्य हाती घेण्यात आले. दोन टप्प्यांत तब्बल १४ तास सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान जवानांनी एअरबॅग आणि विशेष उपकरणांच्या मदतीने ढिगारा हटवत अडकलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

नऊ जणांना मिळाले जीवदान

अथक प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जवानांना स्वतःच्या जीवाचा धोका पत्करावा लागला. या धाडसी कामगिरीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या शौर्याला सलाम केला जात आहे.

आयुक्तांच्या वक्तव्यावरून वाद

दरम्यान, या दुर्घटनेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही घटना नैसर्गिक स्वरूपाची असल्याचे मत व्यक्त केल्याने चर्चा सुरू झाली आहे. दुर्घटनेमागील कारणे, बांधकामातील सुरक्षेचे निकष आणि संबंधित प्रकल्पातील जबाबदारी याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती