पुणे : ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ (संत विचार आणि संविधानिक मूल्ये) या ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर लिखित पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज सकाळी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे झाले.
या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे होते. ज्येष्ठ पत्रकार व संत साहित्याचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ महाराज चोपदार, संत तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब देहूकर, कैकाडी महाराज मठ, पंढरपूरचे मठाधिपती भारत महाराज जाधव, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सेवा दिंडीचे दिंडी प्रमुख ह.भ.प. रविंद्र रामचंद्र तावरे महाराज तसेच पुस्तकाचे लेखक ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात संत परंपरेतील समता, बंधुभाव आणि सामाजिक प्रबोधनाचा वारसा आजच्या संविधानिक मूल्यांशी सुसंगत असल्याचे सांगितले. समाजात जात, धर्म, पंथ आणि भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन मानवतेची जपणूक करण्याचा संदेश संतांनी दिला असून, त्याच मूल्यांचा आधुनिक अभिव्यक्तीस्वरूप भारतीय संविधानात दिसून येतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास संग्राम गायकवाड, ऍड. मोहन वाडेकर, प्रकाश पोटे, ऍड. एन. डी. गायकवाड, शारदा वाडेकर , मधू पाटील यांच्यासह संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शीतल यशोधरा यांच्या ओवी गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपेंद्र टण्णू यांनी केले. एड.संतोष म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. राहुल भोसले यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना बापूसाहेब देहूकर म्हणाले, 'सव्वा चारशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराज यांनी भेदाभेद अमंगल हा विचार मांडला. या क्रांतिकारी विचारांमुळे संत तुकाराम यांची उंची देशात आहे.या विचाराचा विसर पडू नये. तळागाळात हा विचार नेला पाहिजे'.राजाभाऊ चोपदार म्हणाले, 'संविधान आणि संत वाड्मय यांची श्याम सुंदर महाराज यांनी सांगड घातली आहे. जग जरी कोणत्याही एकाच विचाराचे होणार नसले तरी समतेचा विचार मात्र प्रस्थापित झाला पाहिजे.भारत महाराज जाधव म्हणाले, ' वारी आपल्याला समता, बंधुत्व, प्रेम शिकवते. या शिदोरीचा समाजासाठी उपयोग केला पाहिजे.श्याम सुंदर महाराज म्हणाले,' संत विचार आणि संविधान विचाराचा प्रसार करण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. अभंगातील, कीर्तनांतील विचार या पुस्तकात आणला आहे.'
अध्यक्षस्थानावरून बोलताना सुभाष वारे म्हणाले, ' वारीत संत विचार असतो. सर्वांचे स्वागत असते.तिथे डावे, उजवे विचाराचे कार्यकर्ते येत असतात. सकलांसी आहे येथे अधिकार या न्यायाने सर्वांचे तिथे स्वागत होते. मात्र, यापैकी ज्यांचे वागणे संत विचाराला धरून नाही, त्यांचे कान पकडायचे काम वारकरी संप्रदायातील अधिकारी व्यक्तींनी केले पाहिजे. द्वेषाची फॅक्टरी उघडणे संताना कधीच मान्य नव्हते.' परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही हा संतविचार आहे, तो पुढे नेला पाहिजे.