जेजुरी : आषाढी वारीदरम्यान जेजुरी परिसरात रविवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांवर शिधा वाहून नेणारा ट्रक घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 16 ते 18 वारकरी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ही घटना जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात घडली. सकाळी वारकरी पालखीसोबत विठुरायाच्या नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना मागून आलेल्या ट्रकने अचानक नियंत्रण गमावले आणि वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार अशी असून त्या सांगली जिल्ह्यातील रहिवासी होत्या. संबंधित ट्रक नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. हा ट्रक वारीसाठी लागणारा शिधा घेऊन पालखीसोबत जात होता.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाने तापासाठी औषध घेतल्याने त्याला ग्लानी आली. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिशेने गेला, अशी माहिती पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या दुर्घटनेनंतर संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. जखमींवर उपचार सुरू असून प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना व्यक्त करत या अपघाताची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वारकऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात कठोर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.