पुणे : आषाढी वारीदरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बेलसर टोलनाक्याजवळ भरधाव वाहनाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडीला धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. या दुर्दैवी घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. जखमी वारकऱ्यांची विचारपूस करून त्यांनी प्रशासनाला उपचार आणि मदतकार्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
अपघाताची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पालखी सोहळ्याच्या प्रमुखांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली. जखमींना तात्काळ उपचार मिळावेत, कोणत्याही प्रकारची वैद्यकीय कमतरता भासू नये आणि आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच बचावकार्य वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यास सांगितले.
यानंतर त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. प्रत्येक जखमीच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेत त्यांनी उपचारात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, अशी सूचना केली. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी त्यांना धीर दिला आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
या दुर्घटनेबाबत सोशल मीडियावर शोक व्यक्त करत सुनेत्रा पवार यांनी मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. "सासवड–जेजुरी मार्गावर घडलेली ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करते," असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.
यावेळी त्यांनी पालखी मार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दाही उपस्थित केला. "पंढरीच्या वाटेवर निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पालखी मार्गावर वाहन चालविताना चालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनानेही आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात," असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या अपघाताची चौकशी सुरू असून नेमके कारण शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालखी मार्गावरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनेही उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.