छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने राज्यभर सुरू केलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करत दोन खाद्यतेल रिपॅकिंग युनिट्सवर छापे टाकले. या कारवाईत संशयित निकृष्ट दर्जाचे पाम, सोयाबीन, कपाशी तसेच इतर वनस्पती तेलाचा तब्बल 2 कोटी 93 लाख 35 हजार 603 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. गंभीर अनियमितता आढळल्याने दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. दूध भेसळ, हॉटेल्स, मेडिकल दुकाने आणि अन्न प्रक्रिया उद्योगांवर सातत्याने धाडी टाकल्या जात असून, आता खाद्यतेल उद्योगालाही या मोहिमेचा फटका बसला आहे.
11 जुलै रोजी FDAच्या पथकाने पैठण येथील बागरिया अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील बागरिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स या ऑईल रिपॅकिंग युनिट्सची तपासणी केली. यावेळी अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. वापरलेले टिन पुन्हा वापरणे, यंत्रसामग्रीवर गंज व घाण, दुर्गंधीयुक्त तेलाचे साठे, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव, गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा नसणे तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करणे अशा अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून FDAने दिला आहे.
दरम्यान, मराठवाड्यात बनावट आणि भेसळयुक्त दूध विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचाही परिणाम दिसून येत आहे. गेल्या महिनाभरातील धडक मोहिमेनंतर या विभागात दूध संकलनात सुमारे 1 लाख लिटरची घट नोंदवली गेली असून, भेसळयुक्त दूध विक्रीवर मोठ्या प्रमाणात आळा बसत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.