पुणे : कल्पवृक्ष आर्ट गॅलरी, ग्वाल्हेर, रंग समर्थ फाउंडेशन(पुणे) आणि पुणे आर्टिस्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेघदूत' महिला सन्मान महा समूह कला प्रदर्शन दि. १६ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत बालगंधर्व कलादालन, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.या प्रदर्शनात महाराष्ट्रासह विविध भागांतील १५० हून अधिक महिला चित्रकार,शिल्पकार सहभागी होत असून, चित्रकला आणि शिल्पकलेच्या विविध माध्यमांतील उत्कृष्ट कलाकृती रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. निसर्गचित्रे,व्यक्तिचित्रे,अमूर्त कला,लोकजीवन,आधुनिक कला तसेच विविध विषयांवरील कलाकृतींचा समृद्ध संग्रह या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.प्रदर्शन दि.१६ ते १९ जुलै दरम्यान दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
प्रदर्शनाच्या समारोपदिनी रविवार,दि.१९ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सहभागी महिला कलाकारांचा महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.कला रसिक,कला संग्रहक,वास्तुविशारद,इंटिरिअर डिझायनर्स,उद्योजक,विद्यार्थी, पत्रकार तसेच सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिला कलाकारांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन आयोजक पुणे आर्टिस्ट ग्रुप चे सुरेंद्र कुडपणे-पाटील,स्वप्ना पाटसकर,विदुला केळकर ,विद्या रेपाळ,पौर्णिमा वाळुंज,माधुरी पाटणकर,मधुरा पवार,धनश्री काळे,अर्चना कुंभार यांनी केले आहे.