धाराशिव : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग आणि हरिनामाचा जप करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या भक्तिमय वातावरणात वाशिम येथील संत सूरदास महाराज दिव्यांग पायी दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. डोळ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेता येत नसले तरी अंतःकरणातील अढळ श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर 15 दृष्टिहीन वारकरी तब्बल 450 किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरीची वाट चालत आहेत.
ही दिंडी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दाखल होताच नागरिकांनी त्यांचे टाळ-मृदुंग, फुलांची उधळण आणि जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. दिंडीतील वारकरी हातात टाळ, ढोलकीच्या तालावर अभंग म्हणत आणि विठ्ठल नामाचा अखंड जप करत पुढे सरकत आहेत. त्यांच्या सेवेसाठी पाच स्वयंसेवकही सोबत असून संपूर्ण प्रवासात ते वारकऱ्यांना आवश्यक ती मदत करत आहेत.
या दिंडीचा प्रवास केवळ पायी वारी नसून जिद्द, आत्मविश्वास आणि निस्सीम भक्तीचे दर्शन घडवणारा आहे. दृष्टी नसतानाही प्रत्येक पाऊल श्रद्धेच्या आधारावर पुढे टाकत हे वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी मार्गक्रमण करत आहेत. वाटेत अनेक ठिकाणी ग्रामस्थ त्यांचे स्वागत करत असून त्यांच्या भक्तीभावापुढे सर्वजण नतमस्तक होत आहेत.
वारकरी संप्रदायात समतेचा आणि सेवाभावाचा संदेश दिला जातो. त्याच संदेशाचे जिवंत उदाहरण म्हणजे ही दिव्यांग दिंडी. कोणतीही शारीरिक मर्यादा भक्तीच्या आड येऊ शकत नाही, हे या वारकऱ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. विठ्ठलावरील अढळ विश्वास, नामस्मरणाची शक्ती आणि पंढरीच्या दर्शनाची ओढ यामुळे हा संपूर्ण प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
यंदाच्या आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई आणि संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसह हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यामध्ये संत सूरदास महाराज दिव्यांग पायी दिंडीने आपल्या जिद्द, भक्ती आणि चिकाटीमुळे वेगळी ओळख निर्माण केली असून, श्रद्धेला डोळ्यांची नव्हे तर मनाच्या प्रकाशाची गरज असते, हा संदेश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवत आहे.