पुणे : पुणेकरांसाठी पुन्हा एकदा पाणीकपातीची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीच्या काळात नागरिक आणि वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नियमित करण्यात आलेला पाणीपुरवठा आता पुन्हा कमी करण्यात येणार आहे. धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महापालिकेने १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान विभागाचा अंदाज, धरणांतील उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
यंदा मान्सूनच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस न झाल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार जून महिन्यात शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आणि पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. याच काळात आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्याने त्यांची तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ७ जुलैपासून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. पालखी सोहळा पुण्यातून पुढे गेल्यानंतर ही तात्पुरती सवलत संपुष्टात आली आहे.
जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे धरणसाखळीत चांगला पाणीसाठा निर्माण झाला असला, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे धरणांमध्ये होणारी नवीन पाण्याची आवक कमी झाली असून भविष्यातील पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाची चिंता वाढली आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या निर्णयानुसार, १५ जुलैपासून शहरातील बहुतांश भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास आणि पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाल्यास या निर्णयाचा फेरआढावा घेत नियमित पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून अनावश्यक पाण्याची नासाडी टाळण्याचेही सांगितले आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, असेही महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.