सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
  • पुणेकरांना पुन्हा पाणीकपातीचा फटका; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, धरणांतील आवक घटल्याने प्रशासनाचा निर्णय
  • विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
  • ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
 क्राईम

मुंबईत SIR कामाच्या तणावातून बीएलओ शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल; शाळेतच झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा केला प्रयत्न

डिजिटल पुणे    14-07-2026 17:18:50

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेच्या कामामुळे शिक्षकांवर वाढलेल्या कामाच्या तणावाचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. मुंबईतील घाटकोपर येथील असल्फा परिसरात एका बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उमा महेश त्रिलोटकर असे या शिक्षिकेचे नाव असून, त्यांच्यावर विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमा त्रिलोटकर या गेली २३ वर्षे खासगी अनुदानित शाळेत अध्यापनाचे काम करत आहेत. शाळेच्या नियमित जबाबदाऱ्यांसोबत त्यांच्याकडे SIR मोहिमेअंतर्गत बीएलओची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. या अतिरिक्त कामामुळे त्यांच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता. याशिवाय त्यांच्या पतीची प्रकृती गंभीर असल्याने घरातील जबाबदाऱ्याही त्यांनाच सांभाळाव्या लागत होत्या. त्यामुळे काही काळ या कामातून सूट देण्याची विनंती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा केली होती. मात्र, त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सोमवारी दुपारी शाळेत असतानाच त्यांनी झोपेच्या आठ गोळ्या घेतल्या. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडल्याचे सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना तातडीने विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिक्षिकेच्या पतीने प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, शाळेच्या कामासोबत SIR मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातत्याने फोन, संदेश आणि अहवाल सादर करण्याचा दबाव टाकला जात होता. काम पूर्ण न झाल्यास कारवाईची भीती दाखवली जात होती. या सततच्या मानसिक तणावामुळे त्या खचल्या होत्या. त्यांच्या पतीचा अलीकडेच अपघात झाला असल्याने पत्नीला घरातही मोठी जबाबदारी पार पाडावी लागत होती. तरीही त्यांना कोणतीही सवलत किंवा सुट्टी देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

यापूर्वी उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी गंभीर आजार, कौटुंबिक अडचणी किंवा विशेष परिस्थिती असलेल्या शिक्षकांना SIR मोहिमेच्या कामातून तात्पुरती सूट देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रकरणात त्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाली का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या घटनेनंतर शिक्षक संघटनांनीही चिंता व्यक्त केली असून, निवडणूक प्रक्रियेतील अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शिक्षकांवरील वाढता मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. ही घटना राज्यभरातील शिक्षकांच्या कामाच्या वाढत्या ताणाकडे लक्ष वेधणारी ठरत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.


 Give Feedback



 जाहिराती