नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चांवर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी कोणताही ठोस दावा न करता, "राजकारणात जर-तरच्या चर्चा होत असतात," असे सांगत संयत भूमिका घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भेटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्या तरी अद्याप अधिकृत घोषणा किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यावर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी, "शिंदे साहेबांना दिल्लीत अनेक महत्त्वाची कामे असतात," असे म्हणत चर्चांना अधिक महत्त्व देण्याचे टाळले.
दरम्यान, शिवसेनेच्या राज्यमंत्रीपदासाठीही पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्याने पक्षात दाखल झालेल्या खासदारांपैकी कोणाला संधी द्यायची, तसेच विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागांतील राजकीय समतोल कसा साधायचा, यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. प्रतापराव जाधव आणि संजय जाधव यांच्या नावांचीदेखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पक्षाच्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचे केंद्रातील राजकीय वजन वाढले असून, याच पार्श्वभूमीवर पक्षाला अतिरिक्त मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.