सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट वाहतूक बंद!
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 विश्लेषण

कुटुंबाशी शेवटचा संवाद, अवघ्या ४१ मिनिटांत जहाजावर हवाई हल्ला; ओमानजवळील स्फोटात पुण्याचे अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू

डिजिटल पुणे    15-07-2026 11:10:57

पुणे : आखाती भागातील वाढत्या संघर्षाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसू लागला आहे. ओमानच्या सागरी हद्दीजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात पुण्यातील मर्चंट नेव्ही अभियंता हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हल्ल्याच्या अवघ्या ४१ मिनिटांपूर्वी त्यांनी पुण्यातील आपल्या कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर काही क्षणांतच जहाजावर स्फोट झाला आणि या दुर्घटनेत त्यांचा जीव गेला. या घटनेमुळे करमरकर कुटुंबासह संपूर्ण पुण्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेरंब करमरकर हे एम.व्ही. जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. रविवारी पहाटे जहाज ओमानच्या सागरी हद्दीतून होमुर्झ सामुद्रधुनीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यावर हवाई हल्ला झाला. हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूम परिसरात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. त्या वेळी हेरंब इंजिन विभागात काम करत असल्याने ते आगीत अडकले. जहाजावरील इतर २३ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र हेरंब यांना वाचवता आले नाही.

रविवारी पहाटे २.५० वाजता हेरंब यांनी आपल्या कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे केले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या प्रकृतीची आणि कामाची माहिती दिली होती. त्यानंतर संपर्क तुटला. मंगळवारी त्यांच्या कंपनीने नातेवाईकांना फोन करून हेरंब यांच्या मृत्यूची माहिती दिली. ही बातमी समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नातेवाईक आणि मित्रपरिवारानेही हेरंब यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

होमुर्झ सामुद्रधुनी हा जगातील सर्वाधिक महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग मानला जातो. अलीकडच्या काळात या परिसरात व्यापारी जहाजांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण आणि जबाबदार कोण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित आंतरराष्ट्रीय यंत्रणा आणि जहाज कंपनीकडून घटनेचा तपास सुरू असून भारत सरकारही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. हेरंब करमरकर यांचा पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या निधनामुळे पुण्यासह मर्चंट नेव्ही क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती