पुणे : रेल्वेने ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि सुरक्षित करण्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC)च्या संकेतस्थळात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या बीटा आवृत्तीचे सादरीकरण करण्यात आले असून, ती लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या वेबसाईटमुळे तिकीट बुकिंगदरम्यान वारंवार येणारे कॅप्चा, पॉप-अप्स आणि अनावश्यक ग्राफिक्स हटवण्यात येणार असल्याने विशेषतः तत्काळ (Tatkal) बुकिंगचा अनुभव अधिक सुलभ होणार आहे.
नव्या प्रणालीमध्ये सर्व प्रवासी वर्गांतील उपलब्ध जागांची माहिती एकाच स्क्रीनवर दिसणार असून, बुकिंगसाठी लागणाऱ्या टप्प्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रत्येकवेळी प्रवाशांची माहिती पुन्हा भरावी लागणार नाही. तसेच, स्वतःच्या पसंतीची जागा निवडण्याची सुविधा, भाडे कॅलेंडर आणि विविध भारतीय भाषांमधील सेवा यांचाही समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी सवलतीच्या तिकिटांची प्रक्रिया देखील अधिक सुलभ करण्यात आली आहे.
रेल्वेच्या जुन्या 'पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम'मध्येही सुधारणा सुरू असून, नव्या तंत्रज्ञानामुळे बुकिंगची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. सध्याच्या ३२ हजार तिकिटांऐवजी आता प्रति मिनिट सुमारे १.५ लाख तिकिटांचे बुकिंग हाताळण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. तसेच आरक्षण चौकशीची क्षमता ४ लाखांवरून थेट ४० लाख प्रति मिनिट इतकी वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वेच्या अधिकृत 'RailOne' ॲपने ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केला असून, तत्काळ बुकिंगदरम्यान बॉट्सचा गैरवापर रोखण्यासाठीही विशेष सुरक्षा प्रणाली लागू करण्यात येत आहे. जयपूर येथील मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या सुधारणांच्या आधारे ही नवी प्रणाली विकसित करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
याशिवाय रेल्वे मंत्रालयाने कंत्राट प्रक्रिया, मालवाहतूक, कौशल्य विकास आणि जमीन अधिग्रहण यांसह रेल्वे क्षेत्रातील एकूण ५२ महत्त्वाच्या सुधारणांची घोषणा केली असून, त्याचा फायदा प्रवासी आणि उद्योग क्षेत्रालाही होणार आहे.