सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट वाहतूक बंद!
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 शहर

डॉ. विकास कशाळकर : दूरदर्शी संगीतशास्त्रज्ञ, संशोधक

डिजिटल पुणे    16-07-2026 12:49:28

पुणे : डॉ. विकास कशाळकर हे नाव हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतविश्वात एक श्रेष्ठ गायक आणि विद्वान गुरु म्हणून आदराने घेतले जाते. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याप्ती केवळ रंगमंचावरील सादरीकरणापुरती मर्यादित नाही. ते संगीतशास्त्रज्ञ, संशोधक, बंदिशकार, वाग्गेयकार, प्रयोगशील शिक्षक आणि दूरदर्शी विचारवंत म्हणूनही तितकेच प्रभावी आहेत. परंपरेचा गाभा जपत नव्या विचारांचे स्वागत करणे, संगीतशास्त्राकडे चिकित्सक नजरेने पाहणे आणि संशोधनाच्या माध्यमातून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत अधिक समृद्ध करण्याचा सातत्यपूर्ण ध्यास, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.

बंदिशकार म्हणून डॉ. कशाळकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. विविध रागांमध्ये त्यांनी अनेक दर्जेदार बंदिशींची निर्मिती केली आहे. डॉ. कशाळकर यांच्या बंदिशींचे सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे समकालीन विचारांना पारंपरिक अभिव्यक्तीतून व्यक्त करण्याची त्यांची अद्वितीय क्षमता. परंपरागत बंदिशींमध्ये सासू, सून, नणंद, सखी, विरह, मिलन, ऋतू, भक्ती किंवा कृष्ण-राधा यांसारख्या विषयांचे स्थान जसे आहे, तसेच सांस्कृतिक वातावरण त्यांच्या बंदिशींमध्येही जाणूनबुजून जपलेले दिसते. मात्र त्या पारंपरिक चौकटीत राहून ते आधुनिक समाजमनाला स्पर्श करणारे विचार अत्यंत कल्पकतेने गुंफतात. त्यामुळे त्यांच्या बंदिशींमध्ये परंपरेची ओळख कायम राहते, पण त्यांचा आशय आजच्या श्रोत्यालाही तितकाच जवळचा वाटतो. परंपरा आणि समकालीनता यांची ही सुरेल सांगड त्यांच्या बंदिशरचनांना स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्राप्त करून देते. प्रत्येक बंदिशीत रागधर्माची काटेकोर जपणूक, साहित्यिक सौंदर्य, लयबद्धता आणि सांगीतिक परिपक्वता यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. त्यामुळे त्यांच्या बंदिशी कलाकारांसाठी अभ्यासाचा विषय ठरतात, तर रसिकांसाठी त्या रागाच्या सौंदर्याचा नव्याने अनुभव देणाऱ्या कलाकृती ठरतात.

संगीतशास्त्रज्ञ म्हणून डॉ. विकास कशाळकर यांची दृष्टी आजही काळाच्या अनेक पावले पुढे आहे. परंपरेचा गाभा जपत आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यांची सांगड हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात कशी घालता येईल, याचा ते सातत्याने विचार करतात. आज संगीतविश्वात सहज स्वीकारल्या गेलेल्या अनेक तांत्रिक संकल्पना आणि साधनांचा विचार त्यांनी दोन-तीन दशके पूर्वीच प्रत्यक्ष प्रयोगांतून मांडला आहे. त्यांच्या प्रत्येक प्रयोगामागे एकच विचार स्पष्टपणे दिसून येतो. संगीताची गुणवत्ता अबाधित ठेवत कलाकाराचे शिक्षण, साधना आणि सादरीकरण अधिक सुलभ, परिणामकारक आणि काळानुरूप कसे करता येईल.

आज ऑनलाइन शिक्षण पद्धती जगभर स्वीकारलेली संकल्पना आहे. मात्र जवळपास पंचवीस वर्षांपूर्वीच त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून संगीतशिक्षणाची सुरुवात केली. त्या काळात आजच्या प्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध नसतानाही साध्या इंटरनेट मेसेंजरच्या साहाय्याने त्यांनी देश-विदेशातील विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देण्यास सुरुवात केली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ही प्रत्यक्ष शिकविली जाणारी 'गुरुमुखी विद्या' मानली जात असली, तरी तंत्रज्ञान हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. अंतर, देश, वेळ किंवा भौगोलिक सीमा यांमुळे ज्ञानाचा प्रवाह कधीही थांबू नये, ही त्यामागील दूरदृष्टी आज ऑनलाइन संगीतशिक्षणाच्या जागतिक विस्तारातून अधिक प्रकर्षाने जाणवते.

डॉ. विकास कशाळकर यांच्या संशोधनाचा आणखी एक महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी पैलू म्हणजे संगीतोपचार (Music Therapy). भारतीय रागसंगीतामध्ये - मानवी मन, मेंदू आणि शरीरावर परिणाम घडवून आणण्याची विलक्षण क्षमता आहे, या संकल्पनेचा ते केवळ सैद्धांतिक विचार करत नाहीत, तर त्यामागील शास्त्रीय अधिष्ठान शोधण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. विविध रागांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा प्रभाव, तसेच संगीताचा उपचारपद्धती म्हणून कसा उपयोग होऊ शकतो, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.

या संशोधनाच्या आधारे त्यांनी संगीतोपचाराची एक सुबोध, संक्षिप्त आणि परिणामकारक उपचारपद्धती विकसित केली आहे. ही पद्धती केवळ सैद्धांतिक मांडणीवर आधारित नसून प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षणे आणि सातत्यपूर्ण संशोधनातून आकाराला आलेली आहे. या संकल्पनांची परिणामकारकता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी स्वतः तसेच आपल्या शिष्यांसह पुण्यातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये आणि रुग्णांवर अनेक प्रायोगिक उपक्रम राबविले. विविध मानसिक आणि शारीरिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये रागसंगीताच्या साहाय्याने मिळालेल्या अनुभवांचे त्यांनी सातत्याने संकलन, विश्लेषण आणि मूल्यमापन केले. या कार्यामुळे संगीतोपचाराकडे केवळ पूरक उपचारपद्धती म्हणून नव्हे, तर शास्त्रीय संशोधनाच्या स्वतंत्र शाखा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन अधिक दृढ झाला आहे.

आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित झालेले अनेक विद्यार्थी संगीतोपचाराच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध रुग्णालये, आरोग्यकेंद्रे, सामाजिक संस्था आणि स्वतंत्र उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. अशा प्रकारे डॉ. विकास कशाळकर संगीताला केवळ कलासाधनेचे माध्यम न मानता, मानवी आरोग्य, मानसिक संतुलन आणि समाजकल्याणासाठी उपयुक्त ठरणारे प्रभावी साधन म्हणून नवी दिशा देतात.

आवाजशास्त्र हे डॉ. कशाळकर यांच्या संशोधनकार्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. मानवी आवाजाची रचना, स्वरनिर्मितीची प्रक्रिया, श्वसनतंत्र, अनुनाद, उच्चारशुद्धता आणि आवाजाचे आरोग्य यांचा ते सातत्याने अभ्यास करतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज हा स्वतंत्र असतो आणि त्याच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा आदर राखूनच त्याचा विकास झाला पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे कृत्रिम साचे लादण्याऐवजी आवाजातील सहजता, ताकद, माधुर्य आणि अभिव्यक्ती अधिक सक्षम करण्यावर ते विशेष भर देतात. त्यांच्या या अभ्यासाचा लाभ अनेक विद्यार्थी, गायक आणि शिक्षकांना सातत्याने होत आहे.

डॉ. विकास कशाळकर यांच्या मते, कोणत्याही संगीतपरंपरेचे वैभव केवळ श्रेष्ठ कलाकारांमुळे टिकून राहत नाही; ते जाणकार आणि अभिरुचीसंपन्न रसिकांमुळे अधिक समृद्ध होते. याच विचारातून त्यांनी ‘संगीत रसास्वादन कार्यशाळा’ (Music Appreciation Workshop) ही संकल्पना विकसित केली. संगीताचा आस्वाद घेण्यासाठी कलाकार असणे आवश्यक नसून जाणत्या कानांनी ऐकण्याची वृत्ती आणि संगीत समजून घेण्याची जिज्ञासा महत्त्वाची आहे, असे ते मानतात. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संगीतप्रेमी यांच्यासाठी आयोजित व्याख्याने व कार्यशाळांमधून ते संगीत कसे ऐकावे, त्यातील सौंदर्य कसे अनुभवावे आणि कलाकाराच्या अभिव्यक्तीमागील विचार कसा समजून घ्यावा, याचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या मते, संगीतशिक्षणाचा उद्देश केवळ कलाकार घडविणे नसून जाणते रसिक, संस्कारित नागरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध समाज घडविणे हा आहे. म्हणूनच ‘तानसेन’ घडविण्याइतकेच ‘कानसेन’ घडविणेही महत्त्वाचे आहे, ही त्यांची ठाम धारणा आहे.

प्रत्येक बालकाची संगीत ग्रहण करण्याची क्षमता, स्वरांविषयीची नैसर्गिक संवेदनशीलता, लयबोध, श्रवणक्षमता आणि संगीताकडे असलेला अंतर्गत कल हा समान नसतो. या वैयक्तिक भिन्नतेचा अभ्यास करून त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येईल का, या प्रश्नाने प्रेरित होऊन डॉ. विकास कशाळकर यांनी 'सांगीतिक बुद्धिमत्ता' (Musical Quotient) या संकल्पनेवर संशोधन केले आहे. विद्यार्थ्यांमधील संगीतासाठीची नैसर्गिक क्षमता ओळखणे, त्यांच्या बलस्थानांचा शोध घेणे आणि त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे, हा या संशोधनामागील प्रमुख हेतू!

पालकांना आपल्या मुलांच्या - विशेषतः ७ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सांगीतिक क्षमतेची वस्तुनिष्ठ जाणीव व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत गुणांनुसार अधिक परिणामकारक पद्धतीने संगीत शिक्षण देता यावे, या उद्देशाने त्यांनी 'सांगीतिक अभिक्षमता मापन चाचणी' (Music Aptitude Test) विकसित केली. या चाचणीमध्ये संगीताशी संबंधित विविध मूलभूत क्षमता आणि बौद्धिक गुणधर्मांचे परीक्षण करणाऱ्या अनेक उपचाचण्यांचा समावेश आहे. त्यामध्ये Pitch Recognition (स्वर ओळखण्याची क्षमता), Understanding Tempo (लयगतीची जाण), Identifying Tunes and Intensive Listening (चाली ओळखणे व एकाग्र श्रवण), Replica Skills (ऐकलेले अचूक पुनरुत्पादन करण्याची क्षमता), Creative Ability (सर्जनशीलता), Rhythmic Accuracy (लयबद्ध अचूकता), Musical Memory (सांगीतिक स्मरणशक्ती), Notational Memory (स्वरलिपीचे स्मरण), Spatial Ability (अवकाशीय आकलन), Verbal Ability (भाषिक क्षमता), Numerical Ability (संख्यात्मक क्षमता) आणि Constructive Ability (रचनात्मक क्षमता) यांसारख्या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.

या चाचणीचा उद्देश विद्यार्थ्यांना यशस्वी किंवा अयशस्वी ठरविणे हा नसून, त्यांच्या नैसर्गिक सांगीतिक प्रवृत्ती, क्षमता आणि विकासाच्या शक्यता ओळखणे हा आहे. संगीत शिक्षणामध्ये मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि संगीतशास्त्र यांचा समन्वय साधणारी ही संकल्पना भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम ठरू शकतो. विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचा आणि पालकांना जागरूक करण्याचा हा प्रयत्न डॉ. विकास कशाळकर यांच्या संशोधनशील, दूरदर्शी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण आहे.

डॉ. विकास कशाळकर यांच्या संशोधनकार्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचा ‘Creativity in Music’ या विषयावरील प्रबंध. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील सर्जनशीलतेचा विविध अंगांनी शास्त्रीय विचार करणारा हा प्रबंध संगीतक्षेत्रात विशेष चर्चेचा विषय ठरला. संगीतविश्वातील अनेक ज्येष्ठ कलाकार, अभ्यासक आणि संशोधकांनी या संशोधनाचे मनापासून स्वागत केले आणि त्याच्या मौलिकतेचे विशेष कौतुक केले. या प्रबंधाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संगीताचे चिकित्सक विश्लेषण (Analysis) आणि विधायक समीक्षा (Criticism). संगीताचे मूल्यमापन करताना केवळ परंपरेचा किंवा रूढ मतांचा आधार न घेता, शास्त्रीय तत्त्वे, सौंदर्यशास्त्र आणि संगीताच्या मूळ स्वरूपाच्या आधारे वस्तुनिष्ठ विचार कसा करावा, याची त्यांनी दिशा दाखवली. रागसंगीताचा खरा आशय, त्यामागील तत्त्वज्ञान आणि कलात्मक मूल्य यांचा अभ्यासपूर्वक शोध घेण्याचा प्रयत्न या संशोधनामध्ये दिसून येतो.

हा प्रबंध केवळ सैद्धांतिक संशोधन नसून संगीताकडे पाहण्याची एक नवी विचारपद्धती मांडणारा अभ्यासग्रंथ आहे. परंपरेचा सन्मान राखत नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याची प्रेरणा देणारे हे संशोधन संगीतशास्त्राच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. डॉ. विकास कशाळकर यांच्या संपूर्ण कार्याचा विचार करता, त्यांच्या संशोधनामध्ये सातत्याने दिसून येणारी सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टी आणि प्रयोगशील वृत्ती यांचे हे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे.

डॉ. विकास कशाळकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासाचा अत्यंत व्यापक, संशोधनाधिष्ठित आणि चिकित्सक दृष्टीने अभ्यास केला आहे. या अभ्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इतिहासाकडे केवळ घटनांची मांडणी म्हणून न पाहता संगीताच्या सातत्यपूर्ण उत्क्रांतीचा प्रवास म्हणून पाहिले. भारतीय संगीताच्या उगमापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या प्रवासाचा अभ्यास मूळ संदर्भग्रंथ, ऐतिहासिक पुरावे आणि संगीतशास्त्रीय साहित्याच्या आधारे करून भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, अध्यात्म, समाजजीवन आणि कलाविकास यांचा परस्परसंबंध समजावण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.  

प्राचीन काळातील वैदिक संगीत, ऋचा आणि सामगायन, पुराणकालीन संगीतपरंपरा, रामायण आणि महाभारतकालीन संगीत, नाट्यशास्त्रीय परंपरा, मध्ययुगीन संगीताचा विकास, भक्ती आणि सूफी चळवळींचा संगीतावर झालेला प्रभाव, धृपद, हवेली संगीत, ख्याल गायकी आणि आधुनिक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची जडणघडण अशा विविध कालखंडांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. प्रत्येक कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक आणि तात्त्विक परिवर्तनांचा संगीतावर झालेला परिणाम त्यांनी संशोधनपूर्वक उलगडून दाखविला आहे.

आपल्या या प्रदीर्घ अभ्यासाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक व्याख्याने, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आणि अभ्यासवर्ग आयोजित केले. गुंतागुंतीचे ऐतिहासिक विषयही अत्यंत सोप्या, रंजक आणि संशोधनाधिष्ठित पद्धतीने मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे विद्यार्थी, संशोधक, कलाकार आणि संगीतप्रेमी यांना भारतीय संगीताच्या इतिहासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या व्याख्यानांमधून अनेक संशोधक आणि अभ्यासकांना भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास अधिक अभ्यासपूर्ण, पुराव्यांवर आधारित आणि प्रामाणिक स्वरूपात दस्तऐवजीकरण करण्याची प्रेरणा मिळाली. विविध संगीतप्रवाह, घराणी, शैली, वाङ्मयीन संदर्भ आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा कशी विकसित होत गेली, याचे त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासावरील त्यांचे संशोधन, व्याख्याने आणि प्रबोधनपर कार्य हे संगीतशास्त्राच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी योगदान म्हणून सदैव स्मरणात राहील.

डॉ. कशाळकर यांचा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील घराण्यांच्या गायकीचा सखोल, तुलनात्मक आणि संशोधनाधिष्ठित अभ्यास भारतीय रागसंगीतास समृद्ध करणारा आहे. सरांच्या दृष्टीने घराणे ही केवळ परंपरेची ओळख नसून संगीताकडे पाहण्याची स्वतंत्र विचारप्रणाली आहे. प्रत्येक घराण्याची रागदृष्टी, स्वरविचार, लय आणि बंदिशीची मांडणी यांची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. या परंपरांचा अभ्यास ते केवळ सैद्धांतिक न ठेवता त्यांनी देशभर आणि परदेशात आपल्या गायकीतून आणि व्याख्यानांमधून  प्रात्यक्षिके सादर केली आहेत. ‘कल्याण के प्रकार’, ‘कानडा के प्रकार’ आणि ‘मल्हार के प्रकार’ यांसारख्या त्यांच्या व्याख्यानमाला विशेष लोकप्रिय झाल्या. विविध रागकुलांतील साम्य-भेद, रागविस्ताराची दिशा आणि घराण्यानुसार बदलणारी सौंदर्यदृष्टी ते अत्यंत शास्त्रीय, तरीही रसपूर्ण पद्धतीने सप्रयोग उलगडून सांगतात.

ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीन प्रमुख घराण्यांच्या गायकीचे त्यांनी अत्यंत सखोल अध्ययन केले आहे. ग्वाल्हेर घराण्याची उपज व रचनाप्रधान, संतुलित आणि सुबोध मांडणी, आग्रा घराण्याची दमदार आवाजाची हाताळणी, बोलबनाव आणि लयकारी, तसेच जयपूर घराण्याची बौद्धिक रागदृष्टी, गुंतागुंतीच्या रागांची शास्त्रीय मांडणी आणि सूक्ष्म स्वरविन्यास ही वैशिष्ट्ये ते आपल्या गायकीतून अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवतात. एखादा राग या तिन्ही घराण्यांमध्ये कसा वेगळा आकार घेतो, हे ते इतक्या स्पष्टपणे सादर करतात की श्रोत्याला प्रत्येक घराण्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सहज जाणवते. घराण्यांचा इतका सखोल अभ्यास करूनही त्यांनी कोणत्याही एका घराण्याची प्रतिकृती बनण्याचा मार्ग न स्वीकारता त्यांनी स्वतःची स्वतंत्र, मधुर, सात्त्विक, सोज्वळ आणि शुद्ध गायकी विकसित केली आहे. परंपरेची शिस्त, रागधर्माची काटेकोर जपणूक आणि नैसर्गिक प्रवाहीपणा यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या गायकीत अनुभवायला मिळतो.

डॉ. विकास कशाळकर यांनी संगीतशास्त्रज्ञ, संशोधक आणि रचनाकार या भूमिकांबरोबरच संगीत नाटककार म्हणून अभिजात संगीताच्या परंपरेला रंगभूमीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. 'निर्धार' आणि 'ऊस डोंगा परी' ही त्यांनी लिहिलेली दोन संगीत नाटके त्यांच्या साहित्यिक, सांगीतिक आणि संशोधनप्रधान दृष्टिकोनाची साक्ष देतात.

पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या सांगीतिक विचारांचा आणि त्या काळातील सांगीतिक वातावरणाचा सखोल अभ्यास करून त्यांनी 'निर्धार' या नाटकाची संकल्पना उभी केली. पंडितजींचे चरित्र सांगणे नाटकाचा एकमेव उद्देश नसून,  पं. पलुस्कर यांच्या अंतर्मनाचा शोध आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात मागे वळून पाहताना एका महान संगीताचार्याने स्वतःच्या जीवनाचे मूल्यमापन कसे केले असेल? आपल्या संघर्षांविषयी, यश-अपयशांविषयी, ध्येयाविषयी आणि संगीतसेवेविषयी त्यांनी कोणते आत्मचिंतन केले असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न होता. इतिहासातील एखाद्या व्यक्तीची माहिती गोळा करणे वेगळे आणि त्या व्यक्तीच्या मनात प्रवेश करून त्याच्या आत्मसंवादाला शब्द देणे वेगळे. सरांनी हे आव्हान अत्यंत संवेदनशीलतेने स्वीकारले.

'ऊस डोंगा परी' हे संगीत नाटक डॉ. विकास कशाळकर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे प्रभावी दर्शन घडवते. या नाटकाचे लेखन, संगीतरचना आणि संपूर्ण सांगीतिक संकल्पना त्यांनी स्वतः साकारली आहे. सामाजिक समतेचा पुरस्कार, जातीय अस्पृश्यतेचा ठाम विरोध आणि मानवतेच्या मूल्यांचा संदेश हे या नाटकाचे प्रमुख सूत्र आहे. अभिजात संगीताची समृद्ध परंपरा आणि प्रभावी नाट्यभाषा यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी सामाजिक आशयाला कलात्मक अभिव्यक्ती दिली आहे. संगीत नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजप्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरू शकते, हा त्यांचा विचार या नाटकातून प्रभावीपणे व्यक्त होतो.

डॉ. विकास कशाळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा वेध घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांच्यासाठी संगीत ही केवळ कला नसून ती एक अखंड साधना, चिंतन, संशोधन आणि संस्कारांची जीवनदृष्टी आहे. आपल्या ज्ञानोपासनेतून, सृजनशीलतेतून आणि अविरत कार्यातून त्यांनी भारतीय अभिजात संगीतविश्वाला एक अमूल्य वैचारिक आणि सांगीतिक वारसा दिला आहे. अशा या ऋषितुल्य गुरूंना, अमृतमहोत्सवी वर्षापूर्ती निमित्त मनःपूर्वक प्रणाम करताना, उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य आणि अखंड कार्यशक्ती लाभो, तसेच त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि संगीतसाधनेचा प्रकाश भावी पिढ्यांना सतत मार्गदर्शक ठरो, हीच ईश्वरचरणी  प्रार्थना.


 Give Feedback



 जाहिराती