पुणे : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण असताना आता एक आगळीवेगळी चोरी समोर आली आहे. आतापर्यंत सोने, चांदी, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, चारचाकी अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, यावेळी चोरट्यांनी थेट 800 जिवंत कोंबड्यांवरच डल्ला मारला आहे. कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोमधून या कोंबड्या चोरीला गेल्याने व्यापाऱ्यांसह पोलिसांनाही धक्का बसला आहे.
रात्री पार्क केलेल्या टेम्पोवर चोरट्यांची नजर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 13 जुलैच्या पहाटे घडला. फलटण येथून मोठ्या प्रमाणात बॉयलर कोंबड्या घेऊन आलेला टेम्पो नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील पार्किंगमध्ये उभा करण्यात आला होता. चालकाने वाहन सुरक्षितपणे पार्क करून विश्रांतीसाठी तेथून निघून गेला. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी टेम्पोमधील तब्बल 800 जिवंत कोंबड्या चोरून नेल्या.
सकाळी उघडकीस आला प्रकार, मॅनेजरची पोलिसांत धाव
सकाळी चालक परत आल्यानंतर टेम्पोतील कोंबड्या गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने चिकन सेंटरचे व्यवस्थापक धनंजय उरड (वय 50) यांना याची माहिती दिली. त्यानंतर उरड यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
1.60 लाखांचे नुकसान; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
तक्रारीनुसार, चोरीला गेलेल्या प्रत्येक कोंबडीची किंमत सुमारे 200 रुपये असून एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच, कोंबड्या वाहून नेण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा वापर करण्यात आला का, याचाही तपास केला जात आहे.
शहरभर चर्चेचा विषय
पुण्यातील या अनोख्या चोरीची शहरभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका वाहनातून एकाच वेळी 800 जिवंत कोंबड्या चोरीला जाण्याची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात असून, बाजारपेठेतील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याचे आव्हान आता लष्कर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.