पुणे : पुण्यातील बांधकाम क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख यांनी गुलटेकडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये आर्थिक अडचणी, थकीत देणी, व्यावसायिक भागीदारांकडून सहकार्य न मिळाल्याची खंत आणि काही व्यक्तींवर गंभीर आरोप केल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी व्हिडीओ ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार, लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाशी संबंधित जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी 'उत्कर्ष असोसिएट' या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीत माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे आणि इतर काही भागीदारांसह खलील शेख यांचाही सहभाग होता. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र, वक्फ बोर्डाकडून संबंधित जागेवर स्थगिती मिळाल्यानंतर बांधकाम थांबले आणि त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. प्रकल्प रखडल्याने आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आणि त्याचा मोठा फटका सर्व भागीदारांना बसल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडीओत काय म्हटले?
आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये खलील शेख यांनी कंपनीकडून आपली सुमारे ५० लाख रुपयांची देणी थकली असल्याचा दावा केला आहे. तीन वर्षांपासून या रकमेवर व्याज भरावे लागत असल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित देयके वेळेवर मिळाली नसल्यामुळे स्वतःवर मोठे कर्ज झाल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
याशिवाय, एका व्यावसायिक भागीदाराकडून धमक्या मिळाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी व्हिडीओमध्ये केला आहे. "मार्केटमध्ये काम करू देणार नाही, पुण्यात राहणं कठीण करीन," अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, आपल्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना कोणताही त्रास झाल्यास त्यासाठी संबंधित व्यक्तींना जबाबदार धरावे, असेही त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटल्याचे समोर आले आहे. या आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
रविंद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना, खलील शेख यांच्यावर विविध बँकांचे आणि इतर आर्थिक व्यवहारांचे मोठे कर्ज होते, असे सांगितले. वक्फ बोर्डाने संबंधित जागेबाबत आक्षेप घेतल्यानंतर प्रकल्प थांबवावा लागला आणि त्यामुळे संपूर्ण प्रकल्प आर्थिक अडचणीत सापडला. "हा प्रकल्प रखडल्याने सर्व भागीदारांना मोठे नुकसान झाले. वक्फ बोर्डाच्या कारवाईमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले," असे धंगेकर यांनी म्हटले.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि संबंधित भागीदारांची माहिती तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये करण्यात आलेले आरोप, आर्थिक व्यवहार आणि आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा सर्वंकष तपास पोलिसांकडून केला जात असून, तपासानंतरच या प्रकरणाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.