कोल्हापूर/दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळू लागला आहे. कोल्हापूर येथील गोकुळ कामगार संघटनेने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क आणि शिरोली येथील कार्यालयांसमोर 'गेट मीटिंग' आयोजित केली. यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
'विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, सरकारने भूमिका स्पष्ट करावी'
सोनम वांगचुक हे गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनिश्चितकालीन उपोषण करत आहेत. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोकुळ कामगार संघटनेने केला.
'लोकशाहीत आंदोलनांकडे दुर्लक्ष अयोग्य'
संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर निकम यांनी सांगितले की, संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार दिला आहे. अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची साधी दखलही न घेणे ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याची टीका त्यांनी केली.
NEET प्रकरणावर सरकारवर निशाणा
संघटनेचे पदाधिकारी शहाजी भोसले यांनी NEET परीक्षेतील वादामुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारने गंभीरपणे हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयात सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
गेट मीटिंगमध्ये घोषणाबाजी
गेट मीटिंगदरम्यान मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. "संविधान जिंदाबाद", "सोनम वांगचुक आगे बढो, हम तुम्हारे साथ है" आणि "केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा द्या" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष मल्हार पाटील, शाहीर निकम, अशोक पुणेकर, निवास पाटील, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, शहाजी राजे भोसले, योगेश चव्हाण, संभाजी शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कामगार सहभागी झाले.