सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट वाहतूक बंद!
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 शहर

'मेघदूत' महिला सन्मान महा समूह कला प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन

डिजिटल पुणे    16-07-2026 18:32:08

पुणे : कल्पवृक्ष आर्ट गॅलरी, ग्वाल्हेर, रंग समर्थ फाउंडेशन (पुणे) आणि पुणे आर्टिस्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'मेघदूत' महिला सन्मान महा समूह कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज बालगंधर्व कलादालन येथे डॉ.प्रणती टिळक यांच्या हस्ते,ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी,सुधाकर चव्हाण यांच्या उपस्थितीत  उत्साहपूर्ण वातावरणात झाले.हे प्रदर्शन दि. १९ जुलै २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतील १५० हून अधिक महिला चित्रकार आणि शिल्पकार सहभागी झाल्या असून, चित्रकला आणि शिल्पकलेच्या विविध माध्यमांतील उत्कृष्ट कलाकृती रसिकांसाठी सादर करण्यात आल्या आहेत. निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, अमूर्त कला, लोकजीवन, आधुनिक कला तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील कलाकृतींना उपस्थित कला रसिकांनी विशेष पसंती दिली. उदघाटनानंतर सायंकाळी ६ वाजता चित्रकार घनःश्याम देशमुख यांचे 'ललना' विषयावरील प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.सूत्रसंचालन श्रद्धा कामत यांनी केले.  

शुक्रवार दि. १७ जुलै २०२६ रोजी प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता अश्विनी कुदळे यांचे 'शिल्पकला' विषयावरील प्रात्यक्षिक, दुपारी ३ वाजता फ्रायडे पोर्ट्रेट ग्रुपचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.१८ जुलै रोजी दुपारी २ वाजता नंदकुमार गायकवाड यांचे 'रंगांचा वापर कसा करावा' हे प्रात्यक्षिक आणि ४ वाजता कविता साळुंखे यांचे 'निसर्ग चित्र' प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.रविवारी १९ जुलै रोजी  सकाळी ११ वाजता राहुल रानडे यांचे 'निसर्गचित्र' हे प्रात्यक्षिक होणार आहे. दुपारी १ वाजता पूर्णिमा वाळुंज यांचे 'कागदकला' हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. 

प्रदर्शनाच्या समारोप दिनी रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सहभागी महिला कलाकारांचा महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून, कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.या प्रदर्शनाला भेट देऊन महिला कलाकारांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक पुणे आर्टिस्ट ग्रुपचे सुरेंद्र कुडपणे-पाटील, स्वप्ना पाटसकर, विदुला केळकर, विद्या रेपाळ, पौर्णिमा वाळुंज, माधुरी पाटणकर, मधुरा पवार, धनश्री काळे आणि अर्चना कुंभार यांनी केले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती