सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट वाहतूक बंद!
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 विश्लेषण

'३ इडियट्स'आणि सोनम वांगचुक यांचा काहीही संबंध नाही; आमिर खानने दूर केला वर्षानुवर्षांचा गैरसमज, उपोषणावरही व्यक्त केली चिंता

डिजिटल पुणे    17-07-2026 11:18:47

नवी दिल्ली : प्रसिद्ध शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची देशभर चर्चा सुरू असतानाच बॉलिवूड अभिनेता आमिर खानने '3 इडियट्स' चित्रपटाशी संबंधित अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. '3 इडियट्स'मधील 'रँचो' किंवा 'फुंसुक वांगडू' हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचा समज चुकीचा असल्याचे आमिर खानने स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त करत त्यांनी लवकरात लवकर उपोषण मागे घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची देशभर चर्चा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे आणि सतत खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या आंदोलनाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेक कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ओमी वैद्यच्या वक्तव्यानंतर वाढली चर्चा

'3 इडियट्स' चित्रपटात 'चतुर रामलिंगम'ची भूमिका साकारणारे अभिनेता ओमी वैद्य यांनी नुकत्याच एका व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी 'रँचो'ला अशा अवस्थेत पाहायचे नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा 'रँचो' हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.

'चित्रपट बनत होता तेव्हा आम्हाला त्यांची माहिती नव्हती'

ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संवादादरम्यान आमिर खान यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, '3 इडियट्स'ची निर्मिती सुरू असताना त्यांना, दिग्दर्शक राजकुमार हिरानी किंवा लेखक अभिजात जोशी यांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे चित्रपटातील पात्र त्यांच्यावर आधारित असल्याचे म्हणणे वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमिर खान म्हणाले की, ओमी वैद्य यांनी केलेले विधान कदाचित गैरसमजातून आले असावे. त्यामुळे हा गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे वाटल्याने आपण याबाबत स्पष्ट भूमिका मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.

'सोनम वांगचुक यांच्या कार्याचा आम्हाला आदर'

आमिर खान यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांनी शिक्षण, पर्यावरण आणि समाजासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामाचा सन्मान करण्यासाठी '3 इडियट्स'मधील पात्र त्यांच्यावर आधारित असल्याचे सिद्ध करण्याची गरज नाही. त्यांच्या कार्याची ओळख त्यांच्या योगदानामुळेच आहे आणि त्याबद्दल आपल्याला मनापासून आदर असल्याचे त्यांनी नमूद केले.

'त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी'

उपोषणामुळे सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वाढत असलेल्या चिंतेवरही आमिर खान यांनी प्रतिक्रिया दिली. "आम्हा सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटते. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने लवकर संपावे आणि त्यांनी उपोषण मागे घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे," असे आमिर खान यांनी सांगितले.

दरम्यान, आमिर खान यांच्या या स्पष्टीकरणामुळे '3 इडियट्स'मधील 'रँचो' हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची अनेक वर्षांपासून सुरू असलेली चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली असून, त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या विषयावरील गैरसमज दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती