नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. वांगचुक यांच्या पत्नी गितांजली अंगमो यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र पाठवत त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या किंवा कुटुंबीयांच्या संमतीशिवाय कोणतेही इंट्राव्हेनस इंजेक्शन किंवा वैद्यकीय उपचार देऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
गितांजली अंगमो यांनी पत्रात असा आरोप केला आहे की, वारंवार मागणी करूनही रुग्णालय प्रशासनाने सोनम वांगचुक यांचा वैद्यकीय अहवाल उपलब्ध करून दिलेला नाही. तसेच आंदोलनादरम्यान नियमित तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनाही आता भेटण्यास परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे उपचार प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.त्यांनी वांगचुक यांना तातडीने डिस्चार्ज देऊन दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा शनिवारी २१ वा दिवस होता. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून उचलून रुग्णवाहिकेद्वारे सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याचवेळी आंदोलनाशी संबंधित अभिजीत दिपके यांनी, पोलिसांनी त्यांना काही काळ नजरकैदेत ठेवल्यानंतर वांगचुक यांना रुग्णालयात हलवले, असा दावा केला आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दिपके यांनी आंदोलनस्थळी पुन्हा उपोषण सुरू केल्याची माहिती समोर आली.