सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 शहर

प्रा. दिनकर थोपटे यांची कला कारकीर्द चित्रकार, अध्यापक आणि राष्ट्रीय स्तरावरील शिल्पकार : – लेखक डॉ. प्रा. सुधाकर चव्हाण

डिजिटल पुणे    20-07-2026 12:48:54

पुणे : कलाकार हा कायमच असंतुष्ट असतो. तो कधीच समाधानी नसतो, कारण त्याचे आयुष्यच सातत्याने नवे काही शोधण्यात आणि नवे निर्माण करण्यात व्यतीत होत असते. आपण निवडलेल्या क्षेत्रात आयुष्यभर कार्य करणारे कलाकार अनेक पाहायला मिळतात; परंतु एका क्षेत्रातून प्रवास सुरू करून त्यातील विविध आयामांमध्ये स्वतःची सृजनशीलता आणि कौशल्य सिद्ध करणारे, तसेच अनेक क्षेत्रांत लौकिक मिळविणारे कलाकार फारच थोडे असतात. प्रा. दिनकर थोपटे हे अशाच दुर्मीळ कलाकारांपैकी एक आहेत.

५ सप्टेंबर १९४० रोजी जेजुरीजवळील एका लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. चित्रकार होण्याच्या तीव्र इच्छेने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील नामांकित अभिनव कला महाविद्यालयाच्या चित्रकला विभागात प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे समकालीन वर्गमित्र सुदाम डोके, केळकर आणि पाथरे हे होते. शांत स्वभाव, शिकण्याची जिद्द, गोष्टी समजून घेण्याची वृत्ती आणि कोणतेही काम पूर्णत्वास नेण्याची सवय यांमुळे प्रा. डेंगळे, कामत आणि प्रा. खटावकर यांसारख्या गुरुजनांच्या ते विशेष विश्वासातील विद्यार्थी बनले.त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा आणि शिस्त पाहून डिप्लोमा पूर्ण होताच १९७० साली प्रा. नांगरे यांच्या पाठोपाठ त्यांची अभिनव कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९६७-६८ मध्ये मी अभिनवमध्ये शिक्षण घेत असताना ते काही आठवडे आमच्या वर्गावर अध्यापनासाठी येत असत. तोच माझा त्यांच्याशी पहिला परिचय. पुढे वरिष्ठ, मार्गदर्शक आणि जिव्हाळ्याचे मित्र म्हणून त्यांच्याशी असलेले नाते अधिक दृढ होत गेले.

प्रा. दिनकर थोपटे यांचा कलाप्रवास दोन समांतर वाटांनी पुढे जात होता. एका बाजूला ते अध्यापक, विभागप्रमुख आणि नंतर प्राचार्य म्हणून अभिनव कला महाविद्यालयात कार्यरत होते, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या कलासाधनेतही ते तितक्याच निष्ठेने रमले होते. प्रेमळ शिक्षक, विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक, सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे प्रशासक आणि संस्थेचा नावलौकिक वाढविणारे प्राचार्य अशी त्यांची ओळख निर्माण झाली.त्यांनी संस्थेत अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रम राबविले. अध्यापन करताना त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. शक्य तितकी सर्वांना मदत करणे हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता.

याचबरोबर त्यांची अध्यात्माकडेही ओढ होती. नियमित पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणे, एकभुक्त राहणे, सत्संगात सहभागी होणे, काही काळ मौनव्रत पाळणे, तसेच शिजवलेले अन्न आणि परान्नाचा त्याग करून फक्त गूळ आणि शेंगदाणे एवढाच आहार घेणे अशा अनेक गोष्टी त्यांनी आयुष्यभर निष्ठेने पाळल्या. इतरांनी त्यांची थट्टा केली तरी त्यांनी आपल्या श्रद्धेशी कधी तडजोड केली नाही. त्यामुळे मोठी प्रसिद्धी मिळूनही ते सर्वांचे लाडके "थोपटे सर" म्हणूनच राहिले.दाढी, वाढलेले केस, खादीचा कुर्ता, पायजमा आणि कधीकधी जॅकेट असा त्यांचा ऋषितुल्य वेश होता. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळे ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही परिचित झाले.

शैक्षणिक कारकीर्द सुरू असतानाच त्यांनी गुरुवर्य प्रा. खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती आणि देखावे निर्मितीचे शिक्षण घेतले. पुढे स्वतःचे स्वतंत्र काम सुरू करून त्यांनी या क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली. पुण्यातील अनेक मानाच्या गणेश मंडळांसाठी त्यांनी मूर्ती आणि देखावे तयार केले. मात्र त्यांनी स्वतःला गणेशोत्सवापुरते मर्यादित ठेवले नाही. विविध सार्वजनिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांसाठी त्यांनी शिल्पनिर्मिती सुरू केली आणि अल्पावधीतच एक कुशल शिल्पकार म्हणून प्रसिद्ध झाले.

सुबक, प्रमाणबद्ध आणि भावपूर्ण शिल्पनिर्मिती हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य ठरले. त्यांच्या शिल्पांमध्ये सजीवता आणि भावदर्शन यांचा सुंदर संगम दिसून येतो. स्वतंत्र शिल्पे आणि समूहशिल्पांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना साकारल्या. त्यामुळे दूरदूरहून लोक त्यांच्याकडे कामासाठी येऊ लागले. कामाचा व्याप वाढत गेला. या प्रवासात त्यांचे पुत्र अविनाश आणि दीपक यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. दुर्दैवाने अविनाश यांचे निधन झाले; मात्र दीपक आजही ही परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांची नात कनिष्का त्रिमितीय मुद्रण (३डी प्रिंटिंग) क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.अकलूज आणि जे.एन.पी.टी. (उरण) येथे उभारलेली शिवसृष्टी तसेच संतचरित्रावरील समूहशिल्पे त्यांच्या कलेचा भव्य आविष्कार आहेत.

व्यावसायिक यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळूनही त्यांच्या मनात एक वेगळी अस्वस्थता होती. भारतीय समकालीन शिल्पकलेत स्वतंत्र शिल्पकार म्हणून स्वतःची नोंद व्हावी, हा त्यांचा ध्यास होता. या ध्यासातूनच त्यांनी पुण्यातील धायरी येथे "शिल्प साधना आश्रम" या नावाने अत्याधुनिक स्टुडिओ उभारला. याच ठिकाणाहून त्यांच्या समकालीन शिल्पकलेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.चित्रकार म्हणून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रदर्शनांत सहभाग घेतला. अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले. शिल्पकला कार्यशाळा आणि कला शिबिरांचे यशस्वी आयोजन करून त्यांनी उत्कृष्ट संघटन कौशल्यही सिद्ध केले.तथापि त्यांनी चित्रकलेपेक्षा शिल्पकलेलाच आपल्या आयुष्याचे ध्येय मानले. त्या काळात शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस ही प्रमुख माध्यमे असताना त्यांनी फायबरग्लास आणि रेझिनसारख्या औद्योगिक माध्यमांचा कलात्मक वापर सुरू केला. केवळ नवीन माध्यम स्वीकारून ते थांबले नाहीत, तर त्यातून स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली.त्यांच्या शिल्पांना तीन वेळा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला. १९९६ साली "प्रवासी" या शिल्पकृतीसाठी त्यांना ललित कला अकादमी, नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे भारतीय समकालीन शिल्पकलेत त्यांचे नाव विशेष आदराने घेतले जाऊ लागले.

फायबरग्लास माध्यमात प्रभुत्व मिळवल्यानंतरही त्यांची शिकण्याची जिद्द कायम होती. श्रीनगर येथील ज्येष्ठ शिल्पकार श्री. खजुरिया यांच्या सहवासात राहून त्यांनी दगड माध्यमातील शिल्पकलेचा अभ्यास केला. महिनाभर प्रत्यक्ष काम करून त्यांनी या माध्यमातही स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांच्या मेहनतीला, सृजनशीलतेला आणि गुरूंच्या मार्गदर्शनाला या यशाचे श्रेय जाते.

१९६६ मध्ये स्वतंत्र गणेशमूर्ती निर्मितीपासून सुरू झालेला त्यांचा कलाप्रवास आज सहा दशकांहून अधिक काळ अखंड सुरू आहे. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष काम काहीसे कमी केले असले, तरी दीपक आणि कनिष्का यांच्या सहकार्याने "शिल्प साधना आश्रम"मध्ये आजही उत्कृष्ट शिल्पनिर्मिती सुरू आहे. ब्राँझ माध्यमातील त्यांची शिल्पे देश-विदेशात पोहोचली आहेत.आजही वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांच्या मनात नव्या निर्मितीच्या असंख्य संकल्पना आकार घेत आहेत. नवीन कला प्रकल्प उभारण्याची त्यांची जिद्द आणि उत्साह कायम आहे. त्यांच्या प्रदीर्घ, समृद्ध आणि बहुआयामी कला कारकीर्दीला मनःपूर्वक सलाम.

ईश्वर त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सर्जनशक्ती देवो, हीच सदिच्छा.

– डॉ. प्रा. सुधाकर चव्हाण


 Give Feedback



 जाहिराती