नवी दिल्ली : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी 31 वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, जंतरमंतर परिसरातच दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरल्याने तेथील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली.
पोलिसांनी जंतरमंतरमधून आंदोलकांना बाहेर पडू दिले नसले, तरी काही आंदोलकांचा एक गट सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत संसद परिसराच्या दिशेने पोहोचल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर संसद भवन परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे. आंदोलक संसद भवनापासून काही अंतरावर असल्याचे सांगितले जात असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन संसद भवनाच्या काही प्रवेशद्वारांवर तातडीने बंदोबस्त वाढविण्यात आला. सुरक्षा रक्षकांनी संबंधित गेट बंद करून परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली. आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला, तर आवश्यकतेनुसार पाण्याच्या फवाऱ्यांचीदेखील तयारी ठेवण्यात आली.
या आंदोलनात देशातील विविध राज्यांतून आलेले विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले आहेत. आंदोलकांना रोखताना काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. तसेच दगडफेकीच्या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीनंतर त्यांच्या राजीनाम्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असले, तरी यासंदर्भात केंद्र सरकारकडून किंवा संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सीजेपीकडून नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी निष्पक्ष चौकशी, जबाबदारांवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. दुसरीकडे, संसद अधिवेशन सुरू असल्याने दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.