नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या CJP (कॉक्रोच जनता पार्टी) च्या आंदोलनाने सोमवारी आक्रमक वळण घेतले. संसदेवर मोर्चा काढण्याच्या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांनी राजधानीत मोठा बंदोबस्त तैनात केला. जंतरमंतर परिसरात रात्रीपासूनच बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. आंदोलनाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी जंतरमंतर परिसर पूर्णपणे सील केला होता. तरीही CJPचे अनेक समर्थक वेगवेगळ्या मार्गांनी संसद भवनाच्या परिसरात पोहोचले. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केल्याचा तसेच अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर केल्याचा आरोप CJPकडून करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच सरकारकडून चर्चेचा प्रयत्न करण्यात आला. CJPचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, जवळपास दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर केवळ 10 मिनिटांची भेट मिळाल्याचा दावा सौरभ दास यांनी केला. या भेटीत आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन नड्डा यांच्याकडे लेखी स्वरूपात देण्यात आले असून पुढील चर्चेचे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
भेटीनंतर सौरभ दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, "दोन तास वाट पाहिल्यानंतर आम्हाला फक्त 10 मिनिटे भेट मिळाली. आम्ही आमच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या असून सरकारने पुढील चर्चेचे आश्वासन दिले आहे. मात्र, दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर आंदोलकांना ताब्यात घेतले जात असून शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे," असा आरोप केला. त्यांनी सर्व खासदारांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून भूमिका घेण्याचे आवाहनही केले.
दुसरीकडे, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी संसद भवन परिसरात सुमारे 75 हजार आंदोलक जमल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. राजधानीतील अनेक मार्गांवर वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असून परिस्थितीवर दिल्ली पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेले हे आंदोलन आता अधिक व्यापक स्वरूप धारण करत असून, पुढील काही दिवसांत सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चेकडे देशाचे लक्ष लागले आहे.