पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे (PDEA) भूतपूर्व अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी भव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे सलग १० वे वर्ष असून, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने संस्थेच्या वतीने ही स्पर्धा घेतली जात आहे.
विविध गटांत होणार स्पर्धा, ६ लाखांची बक्षिसे
या स्पर्धेत देशभरातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सुमारे ४२५ सायकलपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिनेश कुमार, युवान सप्रू, गंगा दांडीन, सविता हडगळ, श्रावणी परीट यांसारख्या नामवंत खेळाडूंचा समावेश आहे. सर्व वयोगटांतील विजेत्यांसाठी एकूण ६,००,००० रुपयांची रोख बक्षिसे व स्मृतीचिन्हे दिली जाणार आहेत. तसेच प्रसिद्ध दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या सायकलपटूला "घाटाचा राजा" हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जाईल.
स्पर्धेचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
१. पुणे ते बारामती (पुरुष राष्ट्रीय स्तर) – १२२ कि.मी.
२. पुणे ते बारामती (पुरुष राज्य स्तर) – १२२ कि.मी.
३. सासवड ते बारामती (पुरुष MTB खुली स्पर्धा व सायक्लोथॉन रॅली) – ८५ कि.मी.
४. माळेगाव ते बारामती (महिला राष्ट्रीय स्तर) – १५ कि.मी.
शनिवारवाडा येथे भव्य उद्घाटन व जनजागृती रॅली
बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता शनिवारवाडा, पुणे येथून स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न होईल. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, खासदार पार्थ पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीचा समतोल राखण्यासाठी शनिवारवाडा ते हडपसर या 'न्युट्रल झोन' मार्गावर एका विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ३००० ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होऊन प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देणार आहेत. त्यानंतर सकाळी ९.०० वाजता हडपसर (ग्लायडिंग सेंटर) येथून मुख्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाईल. ही मुख्य स्पर्धा वडकीनाला, दिवे घाट, सासवड, जेजुरी, निरा, सोमेश्वरनगर मार्गे बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे समाप्त होईल. तसेच सासवड येथे सकाळी १०.१५ वाजता दिगंबर दुर्गाडे, विजय शिवतारे व संजय जगदाळे यांच्या उपस्थितीत ८५ कि.मी. अंतराच्या MTB स्पर्धेचे उद्घाटन होईल.
दुपारी २ वाजता बारामतीत बक्षीस वितरण
स्पर्धेचा सांगता व बक्षीस वितरण समारंभ दुपार २.०० वाजता ग.दि.मा. सभागृह, बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार आणि युवा नेते जयदादा पवार यांच्या शुभहस्ते पार पडेल.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी घोडदौड
कै. बाबुरावजी घोलप यांनी ७ सप्टेंबर १९४१ रोजी 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन केलेल्या या संस्थेची सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने प्रगती होत आहे. आज संस्थेच्या एकूण १४५ हून अधिक शाखांमधून ९०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नुकत्याच झालेल्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या परीक्षेत संस्थेचा १० वीचा निकाल ९६.६४% तर १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९७.८३% लागला आहे. संस्थेच्या रामकृष्ण मोरे महाविद्यालय (आकुर्डी) व अण्णासाहेब मगर महाविद्यालय (हडपसर) यांना 'A+' मानांकन मिळाले आहे, तर निगडी येथील आयुर्वेद रुग्णालयाला राज्यात प्रथम आणि देशात ७ वा क्रमांक मिळाला आहे.
क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही संस्थेने मोलाची कामगिरी केली आहे. सन २०१२-१३ ते २०२५-२६ दरम्यान संस्थेच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १२५, राष्ट्रीय स्तरावर ४२९ आणि राज्य स्तरावर ७३२ अशी एकूण १२८६ पदके पटकावली आहेत. योगासनात रुद्र काळंबे व श्रेयस तरटे, तर डॉजबॉलमध्ये संतोष कोळी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच, 'पुरुषोत्तम करंडक २०२५' आणि 'राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेत' संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी जसे की डॉ. निलेश साबळे, सौम्या कांबळे (बेस्ट डान्सर ऑफ इंडिया), आणि गिरीजा प्रभू हे कलाक्षेत्र गाजवत आहेत.या सायकल स्पर्धेत व रॅलीमध्ये नागरिकांनी आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम आणि खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांनी केले आहे.