मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता मनोरंजन विश्वातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आंदोलक विद्यार्थ्यांच्या बाजूने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
रितेश देशमुख यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे देशातील तरुणांचा आवाज दाबला जाऊ नये, अशी भूमिका व्यक्त केली. "आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांचा आवाज स्पष्टपणे आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे. हेच तरुण आपल्या लोकशाहीचे बळ आणि देशाच्या भविष्याचे शिल्पकार आहेत," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
यासोबतच त्यांनी नागरिकांना विद्यार्थ्यांचे म्हणणे समजून घेण्याचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. "चला, तरुणांचे ऐकूया, त्यांना साथ देऊया आणि त्यांना सक्षम बनवूया. त्यांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नेच उद्याचा भारत घडवतील," असेही त्यांनी नमूद केले. पोस्टच्या शेवटी #YouthOfIndia, #VoiceOfTheYouth आणि #FutureOfOurNation हे हॅशटॅग वापरत "जय हिंद" असा संदेश दिला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अनेक नामवंत कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसीरुद्दीन शाह, प्रकाश राज यांच्यासह अनेक कलाकार आंदोलनस्थळी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सयाजी शिंदे, शाल्मली खोलगडे आणि इतर कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.