पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ सतारवादक विदुषी जया जोग यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 'नक्षी स्वरलयीची' या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन शनिवार,दि.२५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे.
या विशेष कार्यक्रमात विदुषी जया जोग यांच्या स्वतंत्र रचनांचे सादरीकरण त्यांच्या शिष्य कलाकारांकडून करण्यात येणार आहे.या सादरीकरणात सतारवादनासाठी प्रज्ञा मेने,सुचेता गोसावी,बिना लिमकर,रिशान कुळकर्णी,स्वाती घैसास आणि शताक्षी पाळेकर सहभागी होणार आहेत.बासरीची साथ चक्रवर्ती पाळेकर तर तबल्याची साथ अक्षय पाटणकर करणार आहेत.यावेळी विदुषी जया जोग यांच्या संगीत प्रवासावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू डॉ.सुचेता चापेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी जया जोग (सतार),डॉ. नीलिमा राडकर ( व्हायोलिन) आणि निलेश देशपांडे (बासरी )यांचे सुरेल सहवादन रसिकांना अनुभवता येणार आहे. या सादरीकरणाला तबल्याची साथ अभिजीत बारटक्के करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन रंजना काळे करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा २९८ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.सर्वाना प्रवेश खुला आहे.