सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 शहर

'आजही हे सत्य स्वीकारवत नाही...', अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट; आठवणींना दिला उजाळा

डिजिटल पुणे    22-07-2026 12:40:01

बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती येथील स्मृतीस्थळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिली जयंती असल्याने पवार कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्ताने सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांची आयुष्यभर साथ देणारे जोडीदार, आधारवड आणि प्रेरणास्थान म्हणून आठवण काढली. अनेक वर्षे त्यांचा वाढदिवस आनंदात साजरा केला, मात्र आज तोच दिवस 'जयंती' म्हणून स्वीकारताना मनाला मोठी वेदना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

"आजही हे कटू सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होता. तुमचा आधार, तुमचं प्रेम आणि तुमचा सेवाभाव माझ्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील," अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोस्टच्या शेवटी त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा कायम जपण्याचा निर्धार व्यक्त केला. अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या भावनिक पोस्टने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले असून सोशल मीडियावरही ती मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती