सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 राज्य

काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आज संसदेत मोदींची भेट; शरद पवारांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

डिजिटल पुणे    22-07-2026 12:59:35

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला मंगळवारी भेट देत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी बुधवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

संसदेत झालेल्या या भेटीचे काही फोटो समोर आले असून, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात स्नेहपूर्ण वातावरणात चर्चा झाल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चांदरम्यान ही भेट झाल्याने तिचे राजकीय महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना, "शरद पवार काल जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि त्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी ही भेट झाली असावी. त्यापलीकडे कोणतीही राजकीय चर्चा झाली असेल, असे मला वाटत नाही," असे सांगितले.

मोदींना दिले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील निवेदन

या भेटीदरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रातील कृषी आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे.

या निवेदनात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत, चौकशी प्रक्रियेला गती, मानसिक आरोग्य सहाय्य, सिंचन प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे, किमान आधारभूत किंमतीला (MSP) कायदेशीर हमी, पीक विमा योजनेतील सुधारणा तसेच बनावट बियाणे विक्रीवर कठोर कारवाई अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

भेटीमागे नेमकं काय?

एकीकडे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदींसोबतची भेट यामुळे या चर्चेचे अनेक राजकीय अर्थ काढले जात असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही भेट प्रामुख्याने शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भेटीतून पुढे कोणते राजकीय किंवा प्रशासकीय परिणाम समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती