बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. जयंतीच्या निमित्ताने बुधवारी सकाळी पवार कुटुंबीयांनी गोजुबावी येथील त्या ठिकाणाला भेट दिली, जिथे २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात झाला होता.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील आणि विजया पाटील यांनी अपघातस्थळी जाऊन अजित पवारांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी सुनेत्रा पवार काही काळ अपघातस्थळाकडे एकटक पाहत बसल्या. अजित पवारांच्या आठवणींनी त्या भावूक झाल्याचे दृश्य उपस्थितांच्या मनालाही हेलावून गेले.
याआधी मंगळवारी मध्यरात्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली होती. राज्यभरातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
दरम्यान, २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळील गोजुबावी परिसरात प्रचार दौऱ्यावर असताना अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार, वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला घातपाताच्या शक्यतेवर चर्चा झाली होती, मात्र आतापर्यंतच्या तपासात त्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.
जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावरही अत्यंत भावूक संदेश शेअर केला. "तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करावा लागतो, हे वास्तव आजही स्वीकारता येत नाही," असे म्हणत त्यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सेवाभाव, शिस्त आणि प्रेमाची आठवण आयुष्यभर जपणार असल्याची भावना त्यांनी या संदेशातून व्यक्त केली.