चिखली : गुरुवर्य अकॅडमी स्कूल, चिखली यांच्या वतीने आज ‘शैक्षणिक वारी २०२६-२७’ चे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. ही वारी शाळेपासून विठ्ठल मंदिर, टाळगाव चिखली पर्यंत काढण्यात आली. वारकरी परंपरा आणि शिक्षणाचा सुंदर संगम घडवत विद्यार्थ्यांनी समाजाला विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीचा संदेश दिला.विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंग, अभंग, विठ्ठल नामघोष आणि दिंडीच्या माध्यमातून वारीत सहभाग घेतला.इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वारीद्वारे रस्ता सुरक्षा, प्लास्टिकमुक्त भारत, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, प्रदूषणमुक्त पर्यावरण, पर्यावरण संरक्षण, वीज बचत, डिजिटल सुरक्षा, आरोग्य हीच खरी संपत्ती, अन्न सुरक्षा आणि जागतिक तापमानवाढ यांसारख्या विषयांवर समाजात जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.


या कार्यक्रमास नगरसेवक श्री. विकासभाऊ साने, श्री. विनायक आबा मोरे, नगरसेविका सौ. सोनमताई मोरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारी जोपासण्याचा संदेश दिला. चिखली पोलिस आणि वाहतूक विभागाचे पोलीस यांच्या मदतीने वारी सुरळीत पार पडली.नृत्य शिक्षिका सौ.प्रिती कांबळे आणि संगीत शिक्षिका वर्षा आहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य तसेच विठ्ठल भक्तीगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच क्रीडा शिक्षक श्री प्रफुल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साहसी आणि मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके दाखविली आणि उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला शाळेचे संचालक श्री. भूषण मावळे, मुख्याध्यापिका सौ. ज्योत्स्ना मावळे, समन्वयक सौ. मोहना मॅडम आणि प्रतिभा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सौ. वैशाली अरगडे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.वारीच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच पोलीस प्रशासनाने वारी सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.“ज्ञानाची वारी करूया, शिक्षणाचा दीप प्रज्वलित करूया” या संदेशासह पार पडलेल्या या शैक्षणिक वारीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागरूकता आणि नागरिक म्हणून कर्तव्यभावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित पालक व नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
