मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे सांगतानाच, आंदोलनाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची हिंसा स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
गेल्या ३४ दिवसांपासून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, जंतरमंतर परिसरात झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिविजा फडणवीस यांनी सोशल मीडियावर आपले मत मांडले.
त्यांनी म्हटले की, आंदोलकांकडून पोलिसांवर किंवा पोलिसांकडून आंदोलकांवर होणारी हिंसा या दोन्ही गोष्टी लोकशाहीसाठी घातक आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या मुद्द्याला पाठिंबा देताना त्यामागील राजकीय भूमिका, विचारसरणी आणि उद्देश समजून घेणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
'ट्रेंड' पाहून भूमिका घेऊ नका
दिविजा फडणवीस यांनी सोशल मीडियावरील ट्रेंडच्या प्रभावाखाली निर्णय घेऊ नयेत, असे आवाहन केले. कोणत्याही विषयाचे किंवा आंदोलनाचे आंधळेपणाने समर्थन करण्याऐवजी स्वतःची विचारशक्ती वापरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या मते, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू झालेले आंदोलन मूळ मुद्द्यांवर केंद्रित राहणे आवश्यक आहे. मात्र, आंदोलनाचा विषय नीट पेपरफुटी, एनटीए किंवा शैक्षणिक सुधारणांपासून भरकटून इतर संवेदनशील मुद्द्यांकडे वळत असेल, तर त्यामागील हेतूबाबत सावध राहण्याची गरज आहे.
विद्यार्थी आंदोलन कायम, चर्चेची प्रतीक्षा
नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणारे विद्यार्थी अद्यापही आपल्या मागण्यांवर ठाम असून, सरकारसोबत कोणतीही निर्णायक चर्चा झालेली नाही. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा कधी निघणार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.