नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पेपर लीक प्रकरणांतील आरोपींना जलद शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमधून सांगितले. तसेच, "देशातील युवकांचे भविष्य आणि हितापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही," असेही त्यांनी नमूद केले.
मोदींच्या या विधानानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत "Hi, My Name is Nothing" असे लिहून त्यांनी मोदींच्या "Nothing is more important than the welfare and future of our youth" या विधानावर निशाणा साधला. दीपके यांनी पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असल्याचे स्पष्ट केले.
'दिल्ली बंद चालेल, पण धर्मेंद्र प्रधान हटवायचे नाहीत'
दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेमुळे १६ मेट्रो स्थानके तात्पुरती बंद ठेवण्यात आल्यानंतरही अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर टीका केली. "मोदी संपूर्ण दिल्ली बंद करायला तयार आहेत, पण धर्मेंद्र प्रधान यांना हटवायला तयार नाहीत," असा आरोप त्यांनी केला.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) राजीव चौक, सुप्रीम कोर्ट, आयटीओ, मंडी हाऊस, जनपथ, सेंट्रल सेक्रेटरीएट, दिल्ली गेट, खान मार्केट, इंद्रप्रस्थ, पटेल चौक, लोक कल्याण मार्ग, जोर बाग, शिवाजी स्टेडियम आदी एकूण १६ स्थानके पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनात अडथळे आणल्याचा गंभीर आरोप
दीपके यांनी आंदोलनात बाहेरील व्यक्तींना पाठवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला. आंदोलन सुरू झाल्यापासून अशा घटना घडल्या नव्हत्या, मात्र आंदोलन तीव्र होताच मुद्दाम चिथावणी देण्याचे प्रकार वाढल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, आंदोलकांना बदनाम करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान, जंतरमंतरवरील नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाचा आज ३४ वा दिवस असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक अद्याप ठाम आहेत. सरकारसोबतची चर्चा अद्याप निष्फळ ठरल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.