सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 DIGITAL PUNE NEWS

तिरंगा घेऊन या आणि सहभागी व्हा ; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा, पत्रकार परिषदेत मांडले 10 मोठे मुद्दे

डिजिटल पुणे    23-07-2026 15:38:22

मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला आता महाराष्ट्रातही राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 26 जुलै रोजी मुंबईत तिरंगा मोर्चा काढण्याची घोषणा केली. 23 जुलै रोजी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकार, न्यायव्यवस्था आणि आंदोलनावरील पोलिस कारवाईवर जोरदार टीका करत नागरिक, विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

राज ठाकरे यांनी सांगितले की, हा लढा आता केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिलेला नसून थेट केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधातील आंदोलन बनला आहे. 26 जुलै रोजी सकाळी छत्रपती शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा निघणार असून या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसून केवळ राष्ट्रध्वज असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असून सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, केवळ सोशल मीडियावरील संदेश पुरेसा नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

26 जुलैच्या तिरंगा मोर्चात विद्यार्थी, पालक आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दोन्ही ठाकरे बंधूंनी केले.

मुंबईतील आंदोलनात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार बचावात्मक भूमिकेत गेले आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

हा विषय आता केवळ NEET परीक्षेपुरता मर्यादित नसून जनतेच्या व्यापक असंतोषाचे प्रतीक बनला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.

26 जुलैच्या मोर्चात शरद पवारांसह इतर नेत्यांनाही सहभागी होण्याचे खुले निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी दिले.

पंतप्रधानांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधायला हवा होता, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

सिव्हिल ड्रेसमधील काही व्यक्तींच्या भूमिकेबाबत चौकशीची मागणी करत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

या पत्रकार परिषदेनंतर 26 जुलैच्या तिरंगा मोर्चाकडे राज्याचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले असून, या आंदोलनाला किती लोकांचा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती