सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळित;चिखल अन् खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; उपाययोजनांची मागणी
  • आदित्य ठाकरेंचा मुंबईतील आंदोलनातून अभिजित दिपकेंना कॉल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे , दिपकेंचा निर्धार
  • गुजरात-आसाममध्ये पावसाचा तांडव; 872 गावे पाण्याखाली, लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत; IMD कडून रेड अलर्ट
  • : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
 क्राईम

पुण्यात पोलीस चौकीसमोर भरदिवसा गोळीबार; तरुणाच्या पाठीत गोळी, २० मिनिटांत मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डिजिटल पुणे    24-07-2026 17:35:25

पुणे : पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात शुक्रवारी भरदिवसा पोलीस चौकीसमोरच झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूर शेख हा तरुण जखमी झाला असून त्याच्या पाठीत गोळी लागली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, घटनेनंतर अवघ्या २० मिनिटांत पोलिसांनी मुख्य आरोपी सुजल सुनील परदेशी याला पाठलाग करून ताब्यात घेतले, तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास सुजल परदेशी आणि त्याचे साथीदार दुचाकीवरून घोरपडे पेठ परिसरात आले. त्यांनी नूर शेख याला अडवून त्याच्यावर थेट गोळीबार केला. आरोपींनी सलग तीन राऊंड फायर केल्याचे सांगितले जात आहे. यातील एक गोळी नूर शेखच्या पाठीत लागल्याने तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला.

गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, तर काही क्षणांसाठी परिसरात गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी नूर शेख याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.

घटना पोलीस चौकीसमोर घडल्याने पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. परिसरातील नाकाबंदी करून आरोपींचा पाठलाग करण्यात आला. अवघ्या २० मिनिटांत मुख्य आरोपी सुजल सुनील परदेशी याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. मात्र, त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्वीच्या वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबारामागील नेमके कारण, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. आरोपींविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.भरदिवसा आणि तेही पोलीस चौकीसमोर झालेल्या या धाडसी गोळीबारामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घटनेची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती