पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, याच दरम्यान राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) एका जवानाने स्वतःवर सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण पंढरपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर ध्रुपद साबणे (वय 30) असे मृत जवानाचे नाव असून ते परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा सुरू असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
गोळीबाराचा आवाज ऐकताच घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापतीमुळे जवानाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, जवानाने हे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.