सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 जिल्हा

नाशिक-पालघरला भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात चार हादरे, पावसामुळे पूरस्थितीही गंभीर

डिजिटल पुणे    25-07-2026 16:54:23

नाशिक : नाशिक आणि पालघर जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात अल्पावधीत चार वेळा जमिनीला हादरे बसले, तर पालघरच्या डहाणू तालुक्यातही 3.1 रिश्टर तीव्रतेचा धक्का नोंदवला गेला. सुदैवाने दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

सुरगाण्यात सलग चार भूकंपाचे धक्के

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि परिसरात सकाळी 9.55 वाजल्यापासून एकामागोमाग चार सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची कमाल तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. सलग हादऱ्यांमुळे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पालघरमध्ये पुन्हा 3.1 रिश्टरचा हादरा

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा-धुंदलवाडी परिसरात सकाळी 10.57 वाजता 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. 2018 पासून या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के सातत्याने जाणवत असून आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक हादरे नोंदवले गेले आहेत. मोठी जीवितहानी टळली असली तरी ग्रामीण भागातील कच्च्या घरांना वारंवार तडे जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

भूकंपरोधक घरांचे आश्वासन अद्याप अपूर्ण

डहाणू-तलासरी परिसरातील आदिवासी भागात भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान होत आहे. भूकंपरोधक घरकुले देण्याचे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

दरम्यान, नाशिकच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून 71 हजार क्युसेक, दारणा धरणातून 19,312 क्युसेक आणि गंगापूर धरणातून 12,680 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चांदोरी, सायखेडा, कोठुरे, करंजगाव आणि चापडगावसह अनेक गावांमध्ये पूरपाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणाचा विसर्ग कमी झाल्याने नाशिक शहरातील गोदावरी नदीची पाणीपातळी काहीशी घटली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


 Give Feedback



 जाहिराती