जळगाव : जळगाव शहरातील एका तरुणाने विवाहासाठी वारंवार नकार मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना समाजातील वाढत्या सामाजिक आणि मानसिक तणावावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणारी ठरली आहे. कौस्तुभ पोद्दार या बी. फार्मसी शिक्षित तरुणाला सरकारी नोकरी नसणे, स्वतःचे घर नसणे आणि वृद्ध वडिलांसोबत राहण्याचा निर्णय यामुळे अनेक विवाह प्रस्ताव नाकारले गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
आईच्या निधनानंतर घरात आधार मिळावा म्हणून कुटुंबीयांनी त्याच्या विवाहासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र सलग काही ठिकाणी नकार मिळाल्याने कौस्तुभ मानसिकदृष्ट्या खचला. अखेर फेब्रुवारी महिन्यात त्याने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर त्याचे वडील आणि नातेवाईकांनी समाजाने विवाहाबाबतच्या अपेक्षांमध्ये बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे.
विवाह न जुळल्याने 29 तरुणांनी गमावले जीव
जळगाव पोलिसांनी केलेल्या विश्लेषणानुसार, 1 जानेवारी ते 30 जून या सहा महिन्यांत जिल्ह्यात 400 हून अधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी विवाह होत नसल्याने 29 तरुणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही बाब केवळ वैयक्तिक नव्हे तर गंभीर सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.
सहा महिन्यांतील प्रमुख कारणे
पोलिसांच्या आकडेवारीनुसार पुरुषांमधील आत्महत्यांची प्रमुख कारणे अशी आहेत:
दारूचे व्यसन – 90
नैराश्य – 74
कौटुंबिक वाद – 64
कर्जबाजारीपणा – 52
आजारपण – 44
विवाह होत नसल्याने – 29
प्रेमभंग – 7
मानसिक तणाव – 6
परीक्षेचा ताण – 6
या आकडेवारीतून विवाह, मानसिक आरोग्य आणि सामाजिक अपेक्षा या विषयांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित होत आहे.