पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा कथित १ कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात सहभाग उघड झाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित इरफू मेस्त्री यांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
१८ जुलै रोजी नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यावसायिकाकडील १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला होता. तपासादरम्यान दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. खाकीची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
तक्रारदार हर्षवर्धन पवार यांना घटनेनंतर खेड शिवापूर पोलीस चौकीत नेण्यात आले होते. तपासात महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांनी स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या आशीष तिवारीच्या मदतीने रोकड बाहेर काढण्यास हातभार लावल्याचा आरोप समोर आला. तसेच काही रक्कम अधिकृत मुद्देमाल म्हणून दाखवून प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. या संपूर्ण कटात पोलीस नाईक अजित मेस्त्री यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार हे व्यावसायिक व्यवहारासाठी १ कोटी रुपयांची रोकड घेऊन पुण्यात आले होते. नऱ्हे परिसरातून बँकेकडे जात असताना काही जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत त्यांच्या वाहनाला अडवले. "दोन नंबरचा पैसा" असल्याचे सांगून पैशांच्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. झटापटीदरम्यान मिरची पावडर फेकण्यात आली आणि मोठी रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला.
यानंतर तक्रारदाराला खेड शिवापूर पोलीस चौकीत नेण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी संशयितांच्या बाजूने भूमिका घेत तक्रारदारालाच धमकावल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यानंतर गायब झालेली काही रक्कम परत मिळाली आणि संपूर्ण कट उघडकीस आला.
दहा जणांवर गुन्हा, चौघे अटकेत
या प्रकरणात स्वतःला पत्रकार सांगणारा आशीष तिवारी याच्यासह एकूण दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून, निलंबित दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात आला. या प्रकरणामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, काही दिवसांपूर्वी खंडणीप्रकरणानंतर आता दरोड्याच्या कटातील पोलिसांच्या कथित सहभागामुळे पुन्हा एकदा पोलिस दल चर्चेत आले आहे.