पुणे : पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल खून प्रकरणात त्याच्या होणाऱ्या पत्नी ने त्याला किल्ले लोहगडावरून ढकलून देण्याचा कट रचला होता हे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी सिया गोयल ची चर्चा संपूर्ण देशभरात पोहचली आहे. सध्या सिया गोयल न्यायालयीन कोठडीत असली तरी या नावाची आणखी एक कथित "सिया" चा कारनामा समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील एका पोलिस पाटलाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंग मध्ये चांगला परतावा मिळेल हे आमिष दाखवत "सिया" नावाच्या कथित तरुणीने ५६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
याप्रकरणी मुळशी तालुक्यात कार्यरत असलेल्या संबंधित पोलीस पाटलांनी पौड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने तब्बल ५६ लाखांहून अधिक रक्कम गुंतवूनही एक रुपयाही परत न मिळाल्याने या फसवणुकीची व्याप्ती स्पष्ट झाली आहे.
सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आकर्षक जाहिरातीवर विश्वास ठेवणे पुणे जिल्ह्यातील एका पोलीस पाटलाला चांगलेच महागात पडले. इन्स्टाग्रामवरील रीलमधून सुरू झालेल्या संपर्कानंतर बनावट ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ५६.२५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
इन्स्टाग्राम रीलमधून सुरू झाला संपर्क
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये तक्रारदाराने इन्स्टाग्रामवर शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील एक रील पाहिली. त्यामध्ये एका नामांकित ब्रोकरेज कंपनीच्या नावाने अधिक परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. संबंधित लिंकवर क्लिक करताच त्यांना व्हॉट्सअॅपवरील गुंतवणूक गटात जोडण्यात आले.
'सिया'ने जिंकला विश्वास
गटात सामील झाल्यानंतर स्वतःचे नाव 'सिया' सांगणाऱ्या महिलेने तक्रारदाराशी थेट संपर्क साधला. तिने मोबाईलमध्ये ट्रेडिंग अॅप इन्स्टॉल करून घेतले आणि सुरुवातीला बनावट नफा दाखवत विश्वास संपादन केला. तसेच कमी किमतीत आयपीओ शेअर्स मिळतील, असेही आमिष दाखवण्यात आले.
१३ व्यवहारांत भरले ५६.२५ लाख रुपये
डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने १३ व्यवहारांद्वारे ५६ लाख २५ हजार रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. अॅपवरील डॅशबोर्डमध्ये त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढत असल्याचे दाखवण्यात आले आणि अखेरीस ती रक्कम तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे दर्शवण्यात आले.
पैसे काढताना उघड झाला बनाव
तक्रारदाराने नफा काढण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी आणखी ३० लाख रुपये 'सिक्युरिटी डिपॉझिट' भरण्याची मागणी केली. अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी सर्व संपर्क तोडला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने १९३० सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवून पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पौड पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या जाहिराती, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि मोठ्या परताव्याचे दावे यांवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची खातरजमा करावी आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.