पुणे : श्री स्वामी समर्थ मठ(साकुर्डे ता. पुरंदर) येथील गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला धार्मिक व सामाजिक सोहळा बुधवारी (दि. २९ जुलै) भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला.या प्रसंगी दिव्यांग समाजसेवक बाळासाहेब शंकरराव झेंडे यांना "श्री स्वामी समर्थ भूषण पुरस्कार – २०२६" प्रदान करून गौरविण्यात आले. प्रा. नारायण टाके आणि श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष, राष्ट्रीय पुरस्कार विजेते व ज्येष्ठ शिल्पकार प्रा. दिनकर थोपटे यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच संस्थेसाठी रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
स्व. अविनाश दिनकर थोपटे आणि स्व. रणजीत शिवाजीराव खवले यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सामाजिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान केला जातो.
यंदाचे पुरस्कारार्थी बाळासाहेब झेंडे हे स्वतः दिव्यांग असूनही मानसिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसन आणि सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 'अपंग विकास मंडळ, सासवड' तसेच 'जीवनवर्धिनी विद्यालय' या संस्था प्रभावीपणे कार्यरत आहेत.गुरुपौर्णिमेनिमित्त मठात वृक्षदान कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी दीपक थोपटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, भाविक आणि स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणवीर खवले यांनी केले.
श्री स्वामी समर्थ मठ मंदिर समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रम राबविले जातात. नुकतेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने दीपक थोपटे यांनी दिली.