नाशिक : नाशिक शहरातील सिडको परिसरातील कामटवाडे येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अवघ्या 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर तिचे वडीलही या दुःखातून सावरू शकले नाहीत. लेकीच्या निधनाच्या अवघ्या दोन दिवसांनी त्यांनीही आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या दुहेरी शोकांतिकेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणवी आणेराव (वय 14) हिचा 26 जुलै रोजी राहत्या घरी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण आणेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीच्या अचानक झालेल्या निधनाचा मोठा मानसिक धक्का तिचे वडील हर्षल आणेराव (वय 45) यांना बसला होता. कुटुंबीय आणि नातेवाईक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच 28 जुलैच्या रात्री त्यांनीही राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यामुळे दोन दिवसांतच बाप-लेकीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हर्षल आणेराव यांचे दुसरे लग्न झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या वादामुळे त्यांची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. त्यातच मुलीच्या मृत्यूने त्यांच्यावर मोठा मानसिक आघात झाला होता. या सर्व घटनांमुळे ते प्रचंड तणावाखाली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, संबंधित सर्व बाबींचा तपास सुरू आहे. कुटुंबीयांचे जबाब, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने बाप-लेकीचा झालेला मृत्यू ही घटना संपूर्ण कामटवाडे परिसरासाठी धक्कादायक ठरली आहे. आणेराव कुटुंबावर ओढवलेल्या या दुहेरी शोकांतिकेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.