पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवत फाईल गायब झाल्याच्या कथित प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला.
शिवसेना (शिंदे गट) नेते नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शहरातील विकासकामे रखडली असून महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. काही कार्यकर्ते महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही महापालिकेतील विविध टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. "सर्व टेंडरमध्ये गैरव्यवहार सुरू असून कोट्यवधी रुपयांची उड्डाणे होत आहेत. याबाबतची माहिती पुणेकरांसाठी धक्कादायक आहे," असे ते म्हणाले.
शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्याचा आरोप
शिवसेना (शिंदे गट)चे नेते नाना भानगिरे यांनी शिक्षण मंडळातून महत्त्वाची फाईल गायब झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित टेंडरची फाईल ७ तारखेला शिक्षण मंडळात इनवर्ड झाली. मात्र त्याच दिवशी दुपारी ती फाईल गायब झाली. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित पत्रव्यवहार उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली."जोपर्यंत फाईल गायब होण्याबाबतचे फुटेज आणि संपूर्ण पत्रव्यवहार समोर येत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही," असा इशाराही नाना भानगिरे यांनी दिला.
आयुक्तांच्या बदलीची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, तसेच महापालिका आयुक्तांची बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट)कडून करण्यात आली. शिक्षण मंडळातून फाईल गायब होणे ही पुणे महापालिकेसाठी अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी बाब असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.