पुणे : कृष्णा विश्व विद्यापीठच्या 'सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन'चे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले निर्मित आणि 'कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स'च्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम दिग्दर्शित ‘जॉन्डिस इन न्यूबॉर्न (निओनेटल हायपरबिलिरुबिनेमिया)’ या शैक्षणिक माहितीपटासाठी प्रतिष्ठेचा ‘बेस्ट एमओओसी अवॉर्ड’ मिळाला आहे.या माहितीपटाचे लेखन, निवेदन, ग्राफिक्स आणि संकलन डॉ.पार्वती बालकृष्णन यांनी केले आहे.हा पुरस्कार २७ व्या सीईसी-यूजीसी एज्युकेशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये नुकताच प्रदान करण्यात आला. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (यूजीसी) अंतर्गत कार्यरत कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन (सीईसी) यांच्या वतीने गौतम बुद्ध विद्यापीठ, ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
नवजात बालकांमध्ये आढळणाऱ्या कावीळ (निओनेटल हायपरबिलिरुबिनेमिया) या महत्त्वपूर्ण वैद्यकीय विषयाचे वैज्ञानिक, सुलभ आणि प्रभावी दृश्य माध्यमातून केलेले सादरीकरण विशेष ठरले. वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा चित्रपट अत्यंत उपयुक्त शैक्षणिक साधन म्हणून गौरविण्यात आला.हा पुरस्कार सीईसीचे संचालक तथा महोत्सवाचे संरक्षक प्रा. डॉ. परिक्षत सिंह मनहास आणि सीईसीचे संयुक्त संचालक (सॉफ्टवेअर) तथा महोत्सव समन्वयक डॉ. सुनील मेहरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. बाळकृष्ण दामले हे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ, शैक्षणिक माहितीपट निर्माते आहेत. पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले , "वैद्यकीय शिक्षण अधिक प्रभावी, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याच्या प्रयत्नांना मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे. वैज्ञानिक अचूकता आणि प्रभावी दृकश्राव्य माध्यम यांचा संगम साधणारे दर्जेदार शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी हा पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी ठरेल."