सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'पाऊस
  • पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
  • मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
  • सोलापुरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, 10 प्रवासी जखमी
  • रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
 जिल्हा

भिवंडी इमारत दुर्घटना : 9 जणांचा मृत्यू; बालकासह आणखी तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

डिजिटल पुणे    31-07-2026 13:03:32

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरातील चार मजली कोहिनूर अपार्टमेंट गुरुवारी (30 जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास क्षणार्धात कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली एका बालकासह आणखी दोन ते तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल आणि महापालिकेच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंटच्या एका विंगच्या तळमजल्यावरील काही पिलर कमकुवत झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून इमारतीला तडे जाऊ लागले होते. रात्री आठच्या सुमारास इमारत एका बाजूला झुकत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अनेक कुटुंबांनी इमारत रिकामी केली, मात्र काही रहिवासी घरातील साहित्य आणि मौल्यवान वस्तू घेण्यासाठी पुन्हा आत गेले. त्याचदरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल, पोलिस, महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, इमारतीकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने सुरुवातीच्या बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास एनडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचली. इमारतीसमोरील एक जुनी चाळ जेसीबीच्या साहाय्याने हटविल्यानंतर बचाव पथकांना ढिगाऱ्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले. त्यानंतर अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.

महापालिकेच्या माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंटची बांधणी 2012 मध्ये झाली होती, तर इमारतीचे असेसमेंट यापूर्वी करण्यात आले होते. बांधकामातील त्रुटी आणि संरचनात्मक कमकुवतपणामुळे ही इमारत सुरुवातीपासूनच धोकादायक मानली जात होती. याच कारणामुळे महापालिकेने इमारतीला अतिधोकादायक घोषित करून नोटीसही बजावली होती. तरीही इमारतीत काही कुटुंबे वास्तव्यास होती आणि दुरुस्तीचे कामही सुरू होते.

स्थानिक आमदार महेश चौघुले यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. धोकादायक इमारतीसंदर्भात महापालिकेने पूर्वीच नोटीस दिली होती. तरीही दुरुस्ती सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची शक्यता असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक होता. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन केले असून, बचाव मोहिम पूर्ण होईपर्यंत परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून, दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 31-07-2026 13:47:37

सरकारचे नाकर्तेपणाचे बली जरजरीत इमारती मूले भाडेकरूचा बली जातो योग्य मोबदला गुंतवणूकीचा पटीत देउन भाडेकरूना मालकी हक्क देउन कायमचा प्रश्न सोडवावा

 Give Feedback



 जाहिराती