पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी २०२६ दरम्यान एचपीसीएलच्या पुणे एलपीजी प्रादेशिक कार्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या व्यापक एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला लाखो वारकरी, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आषाढी वारीदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत एचपीसीएलची दोन एलपीजी सुरक्षा जनजागृती वाहने संपूर्ण वारी मार्गावर कार्यरत होती. या वाहनांवरील एलईडी स्क्रीनद्वारे मराठी भाषेत एलपीजी सुरक्षिततेविषयी माहितीपट, जनजागृतीपर चित्रफिती आणि सुरक्षा संदेश सातत्याने प्रसारित करण्यात आले.
वारी मार्गावरील विविध शहरांमध्ये व गावांमध्ये एचपी गॅस वितरकांच्या सहकार्याने मोबाईल सेफ्टी क्लिनिकचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून घरगुती एलपीजीचा सुरक्षित वापर, गॅस गळती टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, आपत्कालीन परिस्थितीत अनुसरावयाची कार्यपद्धती तसेच प्रत्यक्ष सुरक्षा प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानाद्वारे हजारो वारकरी आणि नागरिकांपर्यंत थेट पोहोचून एलपीजीचा सुरक्षित वापर, गॅस गळतीची ओळख, अपघात प्रतिबंध आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.सार्वजनिक सुरक्षा, ग्राहक जनजागृती आणि समाजहिताला प्राधान्य देत राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमातून एचपीसीएलच्या पुणे एलपीजी प्रादेशिक कार्यालयाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक यात्रेदरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानाचे वारकरी, स्थानिक नागरिक तसेच एचपी गॅस वितरकांनी स्वागत करून उपक्रमाचे कौतुक केले.