पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा- २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हौशी रंगकर्मी, नाट्यसंस्था आणि युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.दि. ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ आणि ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ या काळात ही स्पर्धा होणार आहे.यंदाचे हे स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.अधिक माहितीसाठी विजय पटवर्धन (९८२२२ ५२९१२), अभिजित इनामदार (९३२६९ ८९८३५) किंवा धनंजय अमोणकर (९३७०१ ०२४४५) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलावंत प्रकाश इनामदार यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला दरवर्षी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आलेला आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांसाठी आकर्षक करंडक आणि रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. सांघिक प्रथम पुरस्कार म्हणून 'विनोदमूर्ती प्रकाश इनामदार' स्मृती करंडक व रुपये २५,०००, सांघिक द्वितीय पुरस्कार 'विनोदवल्ली प्रदीप पटवर्धन' स्मृती करंडक व रुपये २०,०००, सांघिक तृतीय पुरस्कार 'विवेक बाघ' स्मृती करंडक व रुपये १५,००० आणि सांघिक चतुर्थ पुरस्कार 'निर्मला श्रीनिवास' स्मृती करंडक व रुपये १०,००० प्रदान करण्यात येणार आहेत.याशिवाय सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिकेसाठी 'भालचंद्र पानसे' स्मृती करंडक व रुपये १०,००० तसेच सर्वोत्तम शिस्तबद्ध संघासाठी 'भारती गोसावी' स्मृती करंडक व रुपये ५,००० असे विशेष पुरस्कारही देण्यात येणार आहेत.स्पर्धेसाठी अर्ज वितरणास सुरुवात झाली असून इच्छुक नाट्यसंस्था आणि रंगकर्मी यांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राज्यातील एकांकिका चळवळीला नवे बळ देणारी आणि नव्या कलावंतांना संधी उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा यंदाही रंगकर्मींसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.