पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज (१ ऑगस्ट) होणाऱ्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शाह यांच्या आगमनापूर्वीच युवक काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेसने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केली असून त्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आल्याने दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे यांचा समावेश आहे. या चौघांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांच्या कारवाईनंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता रात्री उशिरा घरातून ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.
व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, आंदोलनासाठी पोलिसांची अधिकृत परवानगी मिळालेली असतानाही मध्यरात्री घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमागे सरकारचा दबाव असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच सकाळी होणारे आंदोलन रोखण्यासाठीच ही कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, अमित शाह शुक्रवारी मध्यरात्री विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
आजच्या दौऱ्यात शाह लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग येथील स्मारकाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने आयोजित सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
दुसरीकडे, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलनाची तयारी सुरू असून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.