पुणे : राज्यातील प्रतिष्ठित शासकीय बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा गंभीर प्रकार समोर आला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील एमबीबीएस प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. रॅगिंगमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप तन्मयच्या कुटुंबीयांनी केला असून, त्यांनी पोलिस तसेच महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
तन्मय वंगे हा कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील रहिवासी असून, नीट परीक्षेत 550 हून अधिक गुण मिळवून त्याने बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयातील काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्याला सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. ग्रामीण पार्श्वभूमीवरून त्याची खिल्ली उडवली जात होती आणि वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
18 जुलै रोजी तन्मय हा नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगून वसतिगृहातून बाहेर पडला. पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेत चढताना दिसून आला. त्यानंतर लोणीकंद परिसरात त्याचा मोबाईल बंद झाला. पोलिसांच्या तपासानुसार 21 आणि 23 जुलै रोजी मोबाईलवरील इंटरनेट काही काळ सुरू झाल्याचे आढळले, मात्र त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बी.जे. मेडिकल कॉलेज प्रशासनाने सहा सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. मात्र, चौकशीचा अहवाल किंवा प्राथमिक निष्कर्ष अद्याप कुटुंबीयांना कळविण्यात आले नसल्याची तक्रार तन्मयच्या वडिलांनी केली आहे. तसेच, महाविद्यालयात रॅगिंगचे प्रकार यापूर्वीही घडल्याचे आणि अनेक पालकांनी अशाच स्वरूपाच्या तक्रारी केल्याचा दावा त्यांनी केला.
तन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी सांगितले की, सुट्टीत घरी आल्यानंतर तन्मयने काही स्थानिक विद्यार्थ्यांकडून त्रास होत असल्याचे सांगितले होते. तक्रार करण्याचा सल्ला दिला असता, पुढील चार वर्षे त्याच महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे असल्याने तो तक्रार करण्यास तयार नव्हता. शालेय मित्रालाही त्याने रॅगिंगमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
मुलगा बेपत्ता झाल्यापासून संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावाखाली असून, तन्मयच्या आईची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचेही वडिलांनी सांगितले. दरम्यान, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी चौकशी समितीचे काम सुरू असून, अहवाल आल्यानंतरच अधिकृत माहिती देण्यात येईल, असे सांगितले आहे.या घटनेमुळे बी.जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.